बॅडमिंटन कोर्टातील वादातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-badminton-dispute-bailबॅडमिंटन खेळण्यावरून झालेल्या वादातून मारहाणीची घटन घडल्यानंतर या प्रकरणी पाचपावली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी जी. श्रीनिवास नायडू (वय ५७) यांनी या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे बॅडमिंटन कोर्टातील वाद आता कायदेशीर संघर्षाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
 
jamin
 
गेल्या १६ नोव्हेंबर २०२६ रोजी पाचपावली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ११५(२), १३१ आणि ३५१(२), तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(आर) आणि ३(१)(एस) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. तक्रारदार सतीश मेश्राम हे २०१७ पासून क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टावर खेळण्यासाठी जात होते. रॉयल स्पोर्ट्स अकादमीकडून या ठिकाणची व्यवस्था सांभाळली जात होती. या कोर्टावर खेळण्यासाठी येण्यावरून नायडू आणि तक्रारदार मेश्राम यांच्यात यापूर्वीही वाद झाला होता.
तक्रारदाराचा २०२१ मध्ये अपघात झाल्याने काही काळ त्यांचा खेळ बंद होता. २०२३ पासून ते पुन्हा नियमितपणे खेळण्यासाठी जाऊ लागले. तक्रारीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास तक्रारदार बॅडमिंटन खेळण्यासाठी गेले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास नायडू अन्य तीन व्यक्तींसह तेथे आले. त्यांनी तक्रारदाराला दुसऱ्या कोर्टावर खेळण्यास सांगितल्याचा आरोप आहे. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. घटनेनंतर तक्रारदाराने १६ नोव्हेंबर रोजी पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
आरोप खोटे असल्याचा दावा
नायडू यांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जात तक्रारदाराचे आरोप फेटाळले आहेत. त्यांचे वकील ॲड. अनमोल गोस्वामी यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी बाजू मांडली. बॅडमिंटन खेळण्यावरून तक्रारदारानेच मारहाण केली आणि त्यानंतर आपल्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली, असा दावा त्यांनी केला आहे. घटना घडल्याचे सांगितलेले ठिकाण हे मर्यादित प्रवेश असलेले बॅडमिंटन कोर्ट असल्याने तेथे झालेला कथित अपमान हा कायद्यातील ‘सार्वजनिक दृष्टीक्षेपातील ठिकाण’ या निकषात बसतो का?, असा मुद्दाही नायडू यांनी उपस्थित केला आहे. तपासासाठी आपली कोठडी आवश्यक नसल्याचा दावा करत त्यांनी अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे.या प्रकरणातील सहआरोपी राजा तेलंग याला १९ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन दिल्याचा उल्लेख नायडू यांच्या अर्जात आहे. त्याच धर्तीवर आपल्यालाही दिलासा द्यावा, अशी मागणी नायडू यांनी केली आहे. न्यायालयाने नायडू यांचा जामीन मंजूर केला.