नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह भारत दौऱ्यावर

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
nepal pm balendra shah
नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह दोन दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ते भारतात आले आहेत. मार्च २०२६ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा शाह यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. तसेच पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पहिलाच द्विपक्षीय परदेश दौरा असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.



नेपाळचे अर्थमंत्री स्वर्णिम वाग्ले, परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल, पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार कुमार ब्यांजंकर आणि अन्य वरिष्ठ सरकारी अधिकारी यांच्यासह बालेंद्र शाह नेपाळ एअरलाइन्सच्या विमानाने दिल्ली येथे पोहोचले. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी बालेंद्र शाह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत भारत-नेपाळ संबंधांचा सर्वांगीण आढावा घेतला जाणार असून, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील समान हितसंबंधांच्या मुद्द्यांवरही विचारविनिमय होणार आहे.

नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दौऱ्याच्या कार्यक्रमाची माहिती दिली. सोमवारी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये प्रतिनिधिमंडळ स्तरावर चर्चा होणार आहे. या बैठकीत परस्पर सहकार्याच्या विविध प्राधान्यक्रमांवर सविस्तर चर्चा केली जाईल. चर्चेनंतर दोन्ही पंतप्रधान संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी नेपाळचे पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत आलेल्या ३४ सदस्यीय सरकारी प्रतिनिधिमंडळाच्या सन्मानार्थ अधिकृत भोजनाचे आयोजन करणार आहेत.

या दौऱ्यात भारत आणि नेपाळ यांच्यातील संपर्कव्यवस्था आणि ऊर्जा सहकार्याशी संबंधित पूर्ण झालेल्या अनेक उपक्रमांचे उद्घाटन केले जाणार आहे. तसेच आगामी प्रकल्पांची पायाभरणीही केली जाणार आहे. व्यापार, वाहतूक, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर दोन्ही देशांचा भर असेल. याशिवाय शिक्षण, आरोग्य, कृषी, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन आणि मनुष्यबळ विकास या क्षेत्रांतील सहकार्याबाबत सामंजस्य करारांची देवाणघेवाण होणार आहे.

भारत आणि नेपाळ यांच्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सभ्यताविषयक संबंध असून, दोन्ही देशांमधील जनतेचेही घनिष्ठ संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर व्यापार-वाणिज्य, विकास भागीदारी, ऊर्जा, जलसंपदा तसेच भौतिक आणि डिजिटल संपर्कव्यवस्था अशा विविध क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळाली आहे. बालेंद्र शाह यांच्या भारत दौऱ्यामुळे या संबंधांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.