वर्धा,
district-due-to-lack-of-water यंदाच्या रब्बी हंगामात पेरणीला सुरुवात झाली असली तरी जिल्ह्यात पेरणीचा वेग अद्याप कमालीचा मंदावलेला आहे. पाण्याअभावी शेतकरी संभ्रमात असल्याचे दिसुन येते. १५ डिसेंबरपर्यंत गव्हाची आणि ३० डिसेंबरपर्यंत हरभर्याची पेरणी सुरू असते. आतापर्यंत मात्र जिल्ह्यात सरासरी क्षेत्रापैकी केवळ १५ टक्के क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. शेतकरी सध्या अनुकूल हवामानाच्या प्रतीक्षेत आहे. पाणी आणि थंडी या दोन्हींशिवाय पेरणी यशस्वी शक्य नसल्याने शेतकरी पेरणीसाठी थांबून आहे.

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्याचे रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १ लाख ९७ हजार ६५१.६१ हेक्टर आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत केवळ १५ हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाल्याचा अंदाज आहे. यंदा हवामानातील चढउतार आणि पाणीपातळी कमालीची घटल्याने रब्बीच्या पेरणीचे वेळापत्रक कोलमडल्याचे दिसुन येते. रब्बी हंगामातील मुख्य पिके असलेल्या ज्वारी, हरभरा आणि गव्हाच्या पेरणीवर या संथ गतीचा थेट परिणाम झाला आहे. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने शेतकरी पेरणीबाबत सावध पवित्रा घेत आहेत. जर या आठवड्यात थंडीचा कडाका वाढला नाही आणि पेरणीला वेग आला नाही तर जिल्ह्यातील रब्बीचे एकूण पेरणी क्षेत्र घटण्याची भीती कृषी तज्ज्ञ शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे.
तालुका निहाय आकडेवारीनुसार देवळी तालुक्यात सर्वाधिक ४ हजार ८५७.२० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. थंडीची चाहूल आणि जमिनीतील ओलावा लक्षात घेता आगामी काळात पेरणीचा वेग किती वाढतो, याकडे शेतकरी आणि कृषी विभागाचे लक्ष लागले आहे.
तालुकानिहाय पेरणी
तालुका पेरणी हेक्टरमध्ये
आर्वी: ३३३.२०
आष्टी: ४३५.२०
कारंजा: २७७.००
वर्धा: २८५६.४०
सेलू: ४८५७.२०
देवळी: १७५८.००
हिंगणघाट: २४१०.००
समुद्रपूर: १६८०.४०