मोफत सर्वरोग निदान शिबिराला उदंड प्रतिसाद

अडीच हजारापेक्षाही अधिक रुग्णांची तपासणी

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
६०० रुग्ण पुढील उपचारांसाठी संदर्भित
 
 
कारंजा लाड,
free-general-medical-check-up-camp कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सईताई डहाके यांच्या पुढाकारातून २२ नोव्हेंबर रोजी मंगरूळनाथ रोडवरील शेतकरी निवास येथे आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २ हजार ५०० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर ६०० रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले.
 
 
washim
 
शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे होते. तर विदर्भ संघटक संयोजक दिनेश सूर्यवंशी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सईताई डहाके, भाजपचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, डॉ. राजीव काळे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, भाजपा पदाधिकारी सुधाताई नाईक, नगर परिषद गटनेत्या शालिनीताई प्रशांत ठाकरे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अरुण ताथोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष प्रकाश लिंगाटे, विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटरचे अध्यक्ष डॉ. शार्दुल डोणगावकर, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी एन. पी .शिंगणे, डॉ. प्रसाद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे), स्व. प्रकाशदादा डहाके मित्र मंडळ, विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात विविध वैद्यकीय विभागांतील १२ तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार व वैद्यकीय मार्गदर्शन केले.
 
 
मेडिसीन, नेत्ररोग, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, दंत व मुखरोग तसेच आयुर्वेद अशा विविध विभागांत रुग्णांची तपासणी करण्यात आली. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, किडनीचे विकार, मोतीबिंदू, सांधेदुखी यांसह विविध आजारांचे निदान करून आवश्यक औषधोपचार व वैद्यकीय चाचण्यांची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली. पुढील उपचार, शस्त्रक्रिया तसेच विशेष वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असलेल्या ६०० रुग्णांना संबंधित रुग्णालयांत उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. पात्र रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नियमानुसार उपचारांचा लाभ मिळणार आहे. दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय ठरला. शिबिराचा समारोप सेवार्थींच्या सत्काराने झाली. यावेळी आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते वृक्षाचे रोप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.