हरियाणा
panchkula car fire हरियाणातील पंचकुला जिल्ह्यात कारला अचानक लागलेल्या आगीत ३६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. साहिल शर्मा असे मृत तरुणाचे नाव असून, तो पंचकुल्याजवळील पीर मुचाल्ला परिसरात राहत होता. व्यवसायाने इंटिरिअर डिझायनर असलेल्या साहिलच्या कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. त्यामुळे साहिलला कारमधून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. मदतकार्य करणाऱ्यांना त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कारचा दरवाजा तोडावा लागला. मात्र, तोपर्यंत आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेतील सर्वाधिक हृदयद्रावक बाब म्हणजे दुर्घटनेच्या काही वेळ आधीच साहिलचा त्याच्या आईशी फोनवर संवाद झाला होता. प्राथमिक तपासातून ही माहिती समोर आली आहे. नेहमीप्रमाणे आईशी झालेला हा साधा संवाद आयुष्यातील शेवटचा ठरेल, याची कुटुंबीयांना कल्पनाही नव्हती. फोनवरील बोलणे संपल्यानंतर काही क्षणांतच साहिलच्या कारला आग लागली आणि तो गंभीररीत्या भाजल्याची बातमी कुटुंबीयांपर्यंत पोहोचली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठवला. या दुर्घटनेमुळे पीर मुचाल्ला परिसरात शोककळा पसरली आहे.
साहिल हा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. त्याच्या अचानक निधनामुळे कुटुंबाचा मोठा आधार हरपला आहे. त्याच्या पश्चात दोन लहान मुले असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, कारला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे आग लागली की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. सखोल चौकशीनंतरच या दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.