नवी मुंबई
panvel railway block पनवेलहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढील काही दिवस रात्रीच्या प्रवासात बदलांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पनवेल-कळंबोलीदरम्यान सुरू असलेल्या नवीन कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. २२ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत दररोज मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत हा ब्लॉक लागू राहणार आहे. त्यामुळे या वेळेत धावणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर आणि मार्गावर परिणाम होणार आहे.

पनवेल-कळंबोलीदरम्यान नवीन कोचिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात पनवेल स्थानकातून अधिक गाड्या चालविणे शक्य होणार असून, रेल्वेगाड्यांच्या देखभाल व्यवस्थेलाही मदत मिळणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वेला दररोज काही तासांचा ब्लॉक घ्यावा लागणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून २२ ते २९ नोव्हेंबरदरम्यान दररोज रात्री १ वाजून ५० मिनिटांपासून पहाटे ४ वाजून ५ मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत कर्जत अप-डाऊन मार्ग, दिवा-वसई-रोहा-पनवेल विभाग आणि पनवेल स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ येथे काम करण्यात येईल. या ब्लॉकचा परिणाम प्रामुख्याने रात्रीच्या वेळेत धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांवर होणार आहे.
ब्लॉकमुळे काही एक्स्प्रेस गाड्या विविध स्थानकांवर सुमारे १० मिनिटांपासून ते दोन तासांपर्यंत थांबवण्यात येणार आहेत. मंगळुरू, मडगाव आणि तिरुवनंतपुरम येथून येणाऱ्या काही गाड्या आपटा, जीते आणि सोमटणे स्थानकांवर थांबवण्यात येतील. तर सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ही गाडी कल्याणमार्गे वळवण्यात येणार आहे.२५ नोव्हेंबरनंतर धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकाबाबत रेल्वे प्रशासनाकडून स्वतंत्र माहिती जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे पनवेल आणि आसपासच्या परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी संबंधित गाडीची अद्ययावत स्थिती आणि वेळापत्रक तपासून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. सध्या होणारा हा बदल तात्पुरता असला, तरी कोचिंग कॉम्प्लेक्सचे काम पूर्ण झाल्यानंतर पनवेलहून अधिक गाड्या चालविण्यास आणि देखभाल व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे.