पुणे
pune news पुणे शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात महापालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या चार दिवसांपासून शहराच्या विविध भागांत अतिक्रमण विभागाकडून धडक कारवाई सुरू असून, अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा पडत आहे. या मोहिमेअंतर्गत सुरुवातीला डेक्कन, त्यानंतर एफसी रोड आणि लक्ष्मी रोड परिसरात कारवाई करण्यात आली. आज या मोहिमेचा मोर्चा औंध, बाणेर आणि बालेवाडी परिसराकडे वळवण्यात आला आहे. बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरात महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू करताच नागरिक आणि व्यावसायिकांची मोठी गर्दी जमली. काही ठिकाणी दुकानदार आणि महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंगही घडल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, अतिक्रमणविरोधी मोहिमेबाबत पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कठोर भूमिका घेतली आहे. महापालिकेने कारवाई केल्यानंतर संबंधित दुकानदारांनी पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केल्यास त्यांचे दुकान किंवा व्यावसायिक आस्थापना कायमस्वरूपी सील करण्यात येईल. तसेच संबंधित दुकानदाराविरोधात गुन्हाही दाखल केला जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे. पुणेकरांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ व्हावे आणि शहरात नागरिकांसाठी चांगल्या सार्वजनिक जागा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ही मोहीम हाती घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कारवाईबाबत माहिती देताना आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की, पुणे शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मोहिमेच्या एका दिवसातच जवळपास दोन लाख चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे हटवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. विशेषतः इमारतींच्या फ्रंट मार्जिन आणि साइड मार्जिनमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत वापरावर महापालिकेचा भर आहे. या जागांचा खासगी व्यावसायिक कारणांसाठी वापर करता येणार नाही. त्या जागा नागरिकांसाठी खुल्या करून त्यांना अधिक चांगल्या आणि सोयीस्कर सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्तांनी पुढे स्पष्ट केले की, काही ठिकाणी फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणे हटवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संबंधित दुकानदारांनी पुन्हा त्या जागांवर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे महापालिकेच्या कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण करणे खपवून घेतले जाणार नाही. संबंधित दुकान, स्टोअर किंवा अन्य कोणताही व्यावसायिक उपक्रम पुन्हा अतिक्रमण करताना आढळल्यास तो कायमस्वरूपी सील केला जाईल. याशिवाय संबंधितांविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची कारवाईही केली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ही मोहीम कोणत्याही व्यावसायिकाला त्रास देण्यासाठी नसून, सर्वसामान्य पुणेकरांच्या हितासाठी राबवली जात आहे. नागरिकांना मोकळ्या जागा, सुरक्षित रस्ते आणि सार्वजनिक वापरासाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे दुकानदार आणि व्यावसायिकांनी महापालिकेच्या कारवाईला सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
पुणे शहराला अधिक चांगल्या सार्वजनिक जागांची गरज असून, त्यासाठी अतिक्रमणमुक्त परिसर निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी काळातही शहराच्या विविध भागांमध्ये ही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या या कठोर भूमिकेमुळे अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.