मुंबई
rapido controversy महाराष्ट्रात रॅपिडोच्या माध्यमातून सुरू असलेल्या दुचाकी प्रवासी वाहतुकीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या वाहतुकीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रॅपिडोविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात मनसे आणि विविध पक्षांशी संबंधित रिक्षा वाहतूक संघटनांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी रॅपिडोच्या प्रवासी वाहतुकीवर आक्षेप नोंदवत ती बंद करण्याची मागणी केली.

नाईक यांच्या म्हणण्यानुसार, रॅपिडो कंपनीकडून कोणतीही आवश्यक परवानगी नसताना दुचाकींवरून प्रवासी वाहतूक केली जात आहे. देशभरात हा प्रकार सुरू असून, महाराष्ट्रातही सरकारकडून अशा वाहतुकीला मोकळीक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये ही वाहतूक सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विविध संघटनांनी याविरोधात भूमिका घेत परिवहन आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला, तरीही परिस्थितीत बदल झालेला नसल्याचे नाईक यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर ऑटो रिक्षा पंचायत समितीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. या दिवशी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि परिवहन आयुक्तांना निवेदने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेसह विविध रिक्षा संघटना एकत्र आल्याची माहिती संजय नाईक यांनी दिली. त्यामुळे आंदोलनाच्या दिवशी राज्यभरातील रिक्षा सेवा बंद राहण्याची शक्यता आहे.
रॅपिडोसारख्या कॉन्ट्रॅक्ट वाहनांच्या माध्यमातून असुरक्षित प्रवासी वाहतुकीचे नवे माध्यम निर्माण होत असल्याचे नाईक यांनी म्हटले. काही ठिकाणी अशी वाहतूक सुरू झाली असून, त्यासंदर्भातील अनेक प्रश्न अद्याप सरकारदरबारी प्रलंबित आहेत. परिवहन आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा परिवहन मंत्री यांच्याकडून संघटनांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे बाबा कांबळे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व संघटना एकत्र आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रवासी वाहतुकीसाठी लागू असलेल्या नियमांचाही नाईक यांनी उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाकडे नियमानुसार बॅच असणे आवश्यक आहे; मात्र रॅपिडोच्या दुचाकी चालकांकडे तो नसतो. तसेच व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी वाहनांना पिवळी नंबर प्लेट असणे गरजेचे असताना रॅपिडोच्या दुचाकींवर ती नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. मुंबईतील टॅक्सीला शहराबाहेर जाण्याबाबत मर्यादा असताना रॅपिडोच्या माध्यमातून मुंबईहून थेट पुण्यापर्यंत प्रवास करता येतो, असे उदाहरणही त्यांनी दिले. ही दुचाकी प्रवासी वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी, हीच संघटनांची प्रमुख मागणी असल्याचे संजय नाईक यांनी सांगितले.