कीव,२२
russia-strikes-zelenskyy-hometownरशियाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे मूळ गाव असलेल्या क्रिव्हि रिहला लक्ष्य करत क्षेपणास्त्रांचा मारा केला. यात चार जण ठार आणि ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात अनेक निवासी इमारती आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या.
क्रिव्हि रिह शहर प्रशासनाचे प्रमुख ओलेक्झांडर विल्कुल यांनी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात एक ७ वर्षांचा मुलगा आणि २० वर्षांच्या महिलेसह चार जण ठार झाले. शनिवारी रात्री झालेल्या हल्ल्यात निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या. ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याने मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्रादेशिक लष्करी प्रशासनाचे प्रमुख ओलेक्झांडर हांझा यांनी सांगितले की, या हल्ल्यात सहा मुलांसह ६० जण जखमी झाले आहेत. पंचवीस इमारती, एक रुग्णालय, एक शाळा, एक औद्योगिक युनिट, अनेक व्यवसाय आणि डझनभर वाहनांचे नुकसान झाले. झेलेन्स्की यांनी म्हटले की, क्रिव्हि रिह शहरावर झालेल्या रशियन हल्ल्यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हा हल्ला एका निवासी भागावर झाला, जिथे कोणतेही लष्करी तळ नव्हते. रशियन हल्ल्यात नागरिकांची घरे आणि नागरी सुविधांचे नुकसान झाले आहे. खार्किव्ह, डोनेत्स्क, ड्निप्रो, रिव्हने, चेर्निहिव्ह, मिकोलाइव्ह आणि झापोरिझिया या प्रदेशांमध्ये हल्ले झाले. सुमी प्रदेशातील एका रेल्वे स्थानकाला लक्ष्य करण्यात आले. अशा हल्ल्यांवर जगाने गप्प बसू नये.
नाटोचे सदस्यत्व हीच सर्वात मोठी सुरक्षा : झेलेन्स्की
नाटोच्या सदस्यत्वातूनच युक्रेनच्या रक्षणाची हमी मिळू शकते, देशाच्या सुरक्षेसाठी हाच सर्वात मजबूत पर्याय असल्याचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. नाटोच्या कलम ५ सारख्या पर्यायी सुरक्षा व्यवस्थेसाठी लेखी आणि ठोस वचनबद्धता आम्हाला हवी आहे.
ट्रम्प यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही युक्रेनला सुरक्षा हमी सुरू राहावी अशी आमची मागणी आहे. मित्र राष्ट्रे देखील नाटो सदस्यत्वाला सर्वात प्रभावी पर्याय मानतात. कोणत्याही पर्यायी व्यवस्थेसाठी ठोस लष्करी वचनबद्धतेची आवश्यकता आहे.
तोंडी आश्वासने नव्हे, तर लेखी करार हवा
झेलेन्स्की यांनी सांगितले की, सुरक्षा हमी केवळ विधानांपुरती मर्यादित नसावी. संकटाच्या काळात मित्र राष्ट्रांची जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी, ती लेखी स्वरूपात स्पष्टपणे नमूद केली पाहिजे. युक्रेनला अशा प्रणालीची गरज आहे जी हल्ल्याच्या वेळी संरक्षण करू शकेल. आम्हाला केवळ दोन वर्षांसाठी नव्हे, तर कायमस्वरूपी सुरक्षा हमी हवी आहे. आंतरराष्ट्रीय सीमांची पुनर्रचना करणे आणि जगाला प्रभावक्षेत्रांमध्ये विभागण्याच्या आपल्या उद्दिष्टात पुतिन यशस्वी झालेले नाहीत. युक्रेनवर १११ क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याबद्दल त्यांनी रशियावर टीका केली.