मुंबई
shafqat amanat ali ‘मितवा’ या लोकप्रिय गाण्याच्या माध्यमातून जगभरातील संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध पाकिस्तानी गायक शफकत अमानत अली सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. गेल्या काही काळापासून ते संगीतविश्वापासून आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. त्यांच्या या अनुपस्थितीमागचे कारण आता समोर आले असून, त्यांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले होते, असा धक्कादायक खुलासा त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा बरीच सुधारली असून आपण धोक्याबाहेर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटातील ‘मितवा’ हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या विशेष पसंतीचे आहे. या गाण्याला शफकत अमानत अली यांनी आपला दमदार आवाज दिला होता. या गाण्यामुळे त्यांना भारतासह जगभरात मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या आवाजाची वेगळी ओळख निर्माण झाली होती. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ते प्रसिद्धीपासून दूर होते. भारतातही ते फारसे दिसले नव्हते. आता त्यांच्या प्रकृतीविषयी समोर आलेल्या माहितीनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शफकत अमानत अली यांनी आपल्या आजारपणाचा अनुभव सांगितला. त्यांना ‘मल्टिपल मायलोमा’ या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले होते. या आजारामुळे त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. जवळपास वर्षभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. बोन मॅरो बायोप्सीचे अहवालही स्पष्ट आले असून, हे सकारात्मक संकेत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण आता धोक्याबाहेर असल्याचेही त्यांनी मुलाखतीत नमूद केले.
प्रकृतीत सुधारणा होत असली, तरी त्यांचे उपचार अद्याप पूर्ण झालेले नाहीत. शफकत अमानत अली यांना आठवड्यातून एकदा केमोथेरपी घ्यावी लागत आहे. याशिवाय, त्यांच्यावर ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट म्हणजेच स्वतःच्याच पेशींच्या मदतीने प्रत्यारोपणाची प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेनंतर ते पूर्णपणे बरे होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या गंभीर आजारामुळेच आपल्याला संगीतक्षेत्रापासून काही काळ दूर राहावे लागल्याचेही गायकाने स्पष्ट केले. आता मात्र पुन्हा एकदा संगीतविश्वात सक्रिय होण्यासाठी आपण सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या पुनरागमनाच्या दृष्टीने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी कराची येथे त्यांचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर लाहोर आणि इस्लामाबाद येथेही त्यांचे संगीत कार्यक्रम होणार असल्याची माहिती माध्यमांच्या वृत्तांतून समोर आली आहे.दरम्यान, स्वतःच्या आजारपणाचा अनुभव सांगताना शफकत अमानत अली यांनी चाहत्यांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि वेळेत वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. सुरुवातीच्या टप्प्यातच आपल्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाल्यामुळे वेळेवर उपचार घेणे शक्य झाले, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रकृतीत होत असलेली सुधारणा आणि संगीतक्षेत्रात पुन्हा परतण्याच्या तयारीमुळे चाहत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.