२६/११ च्या भीषण हल्ल्याच्या आठवणी सांगताना देविका रोटावन भावूक

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
मुंबई
shah rukh khan मुंबईवर झालेल्या २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. या हल्ल्यातील सर्वांत लहान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांपैकी एक असलेल्या देविका रोटावन यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्या काळातील भयावह अनुभव पुन्हा एकदा कथन केले.
त्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी ऐकून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांच्यासह अभिनेता रणवीर सिंह आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले कलाकार व मान्यवर भावूक झाले. अवघ्या नऊ वर्षांच्या वयात दहशतवादी हल्ल्याचा सामना करावा लागला, त्यानंतर न्यायालयात साक्ष देण्यापासून ते आयुष्यातील अनेक संघर्षांना तोंड देण्यापर्यंतचा प्रवास देविका यांनी यावेळी उलगडला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे दिव्यज फाउंडेशनच्या वतीने 'ग्लोबल पीस ऑनर्स २०२६' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीदांना अभिवादन करत दिव्यज फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि समाजकल्याण अशा विविध क्षेत्रांत फाउंडेशनकडून सातत्याने उल्लेखनीय काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात २६/११ हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावन यांचीही उपस्थिती होती. अभिनेता शाहरुख खान यांनी त्यांच्याशी संवाद साधत हल्ल्याच्या आठवणी आणि त्यानंतरच्या संघर्षाविषयी जाणून घेतले.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी देविका अवघ्या नऊ वर्षांच्या होत्या. वडील आणि भावासोबत पुण्याला जाण्यासाठी त्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. त्याचवेळी दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे स्थानकावर एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू असताना देविका यांच्या उजव्या पायाला गोळी लागली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना अनेक शस्त्रक्रियांनाही सामोरे जावे लागले. हल्लेखोरांना प्रत्यक्ष पाहिल्यामुळे पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याची ओळख पटवण्यात देविका यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.

या संवादादरम्यान शाहरुख खान यांनी देविका यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. एवढ्या लहान वयात, रुग्णालयातून घरी परतल्यानंतर न्यायालयात साक्ष देण्याचे धैर्य त्यांच्यात कसे आले, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना देविका यांनी आपल्या वडिलांनी दिलेल्या शिकवणीचा उल्लेख केला. सत्याच्या मार्गावर चालावे आणि कोणत्याही संकटाला न घाबरता ठामपणे सामोरे जावे, अशी शिकवण वडिलांनी दिली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या याच धैर्यामुळे आपण न्यायालयात साक्ष देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. हल्ल्यानंतर देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा मनात निर्माण झाली होती. मुंबई पोलीस, सैन्यदल आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर अधिकाऱ्यांच्या बलिदानातून प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी देविका यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील पोलीस अधिकारी तुकाराम ओंबळे यांच्या शौर्याचाही विशेष उल्लेख केला. त्यांच्या धाडसामुळे आणि बलिदानामुळे आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. दहशतवादी हल्ल्याने आपले बालपण हिरावून घेतले. आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या, तरी दहशतवादाविरोधात आवाज उठवण्याचा आपला निर्धार कधीही कमी झाला नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हल्ल्यानंतरचा काळही देविका आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत संघर्षाचा ठरला. शारीरिक जखमांबरोबरच मानसिक त्रास आणि सामाजिक अडचणींचाही सामना करावा लागला. त्यांना धमक्या मिळाल्या, अपमानास्पद टिप्पण्यांना सामोरे जावे लागले आणि अनेक प्रकारच्या समस्यांनी त्यांना त्रस्त केले. या घटनेचा परिणाम त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर झाला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली आणि त्यांच्या वडिलांचा व्यवसायही बंद पडला. मात्र, एवढ्या संकटांनंतरही वडिलांनी कधीही हार मानू नये, अशी शिकवण दिली. त्याच शिकवणीच्या बळावर आपण आयुष्यातील कठीण प्रसंगांचा सामना करत राहिल्याचे देविका यांनी सांगितले.

संवादाच्या शेवटी देविका यांनी दहशतवाद आणि मानवी धैर्य याबाबत अत्यंत भावनिक संदेश दिला. दहशतवादी एखाद्याचे प्राण हिरावून घेऊ शकतात, आयुष्यात अनेक संकटे निर्माण करू शकतात; मात्र माणसाची आशा, हिंमत आणि मानवता कधीही संपवू शकत नाहीत, असे त्या म्हणाल्या. एका व्यक्तीने दाखवलेल्या धैर्यातून अनेकांना प्रेरणा मिळू शकते. त्यामुळे दहशतवाद संपवण्यासाठी आणि देशासाठी आपले योगदान देण्यासाठी प्रत्येकाने लढत राहिले पाहिजे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

देविका यांच्या संघर्षाची कहाणी ऐकल्यानंतर शाहरुख खान यांनी त्यांच्या धैर्याचे मनापासून कौतुक केले. एवढ्या कोवळ्या वयात मृत्यूला समोरून पाहिल्यानंतरही न्यायासाठी उभे राहण्याचे धाडस दाखवणाऱ्या देविका या खऱ्या अर्थाने हिरो असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या जिद्दीला आणि धैर्याला सलाम करत शाहरुख यांनी त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, तसेच त्यांच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, अशा शुभेच्छाही दिल्या. देविका यांच्या अनुभवांनी कार्यक्रमातील उपस्थित कलाकार आणि मान्यवरही हेलावून गेले. २६/११ च्या हल्ल्यातील जखमा केवळ शरीरावरच नव्हे, तर मनावरही किती खोलवर उमटतात, याची जाणीव त्यांच्या कथनातून पुन्हा एकदा झाली.