सोलापूर
solapur water crisis सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून, जाधववाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांसाठी अनोखे आंदोलन सुरू केले आहे. पाणी मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. याशिवाय गावातील शाळा आणि बाजारपेठेतील व्यवहार बंद ठेवण्यासह आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.
उजनी धरणातील पाणी कालव्याद्वारे सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून गावाला उपलब्ध करून द्यावे, अशी जाधववाडीकरांची मागणी आहे. या मागणीसाठी ग्रामस्थ गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा आणि संघर्ष करीत आहेत. मात्र, अद्याप पाण्याचा प्रश्न सुटलेला नसल्याने त्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे.
पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत गावातील राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी लागू करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकत्रितपणे घेतला आहे. त्यासाठी गावात प्रवेशबंदीचा फलकही लावण्यात आला आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेत मुलांना न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गावातील बाजारपेठेतील व्यवहारही बंद ठेवण्यात आले आहेत.
केवळ आश्वासनांवर समाधान न मानता प्रत्यक्ष पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकांमध्ये मतदान न करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला आहे. पाण्याअभावी शेतीवर परिणाम होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे जाधववाडीतील पाणीप्रश्नाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.