मानोरा,
arunavati riverbed धामणी परिसरातील अरुणावती नदीपात्रातून सध्या मोठ्या प्रमाणात मोटारपंपाद्वारे पाण्याचा उपसा सुरू आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे अरुणावती नदीचे पात्र आधीच कोरडे पडले असून, नदीपात्रातील ठिकठिकाणी असलेले डोहही दिवसेंदिवस आटत चालले आहेत. अशा परिस्थितीत नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू राहिल्यास उर्वरित पाणीसाठाही संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे धामणी ग्रामस्थांनी हा उपसा तात्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार, मानोरा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अरुणावती नदी ही धामणी व परिसरातील गावांसाठी जीवनवाहिनी आहे. नदीतील पाण्यावरच परिसरातील जनावरांना व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अवलंबून आहे. सध्या मोटारपंपाने मोठ्या प्रमाणावर पाणी उपसल्यामुळे नदीतील डोह आटत चालले आहेत. हा उपसा असाच सुरू राहिला तर येत्या काही दिवसांतच परिसरातील जनावरांना पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होऊ शकते.तसेच गावातील पिण्याच्या पाण्याच्या बोअरचीही भूजल पातळी खालावल्यास ग्रामस्थांनाही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता, प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अरुणावती नदीपात्रातून मोटारपंपाद्वारे सुरू असलेला पाण्याचा उपसा तात्काळ बंद करावा.arunavati-riverbed तसेच प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना योग्य त्या सूचना देऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर दिपक पाटील, मिलिंद धोटे, मनिष पाटील, रामप्रसाद ठाकरे, जावेद खान दौलत खान, रवी शेगोकार आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.