देश आणि समाजाचा विचार करणारे नागरिक घडविणे हेच संघाचे कार्य : रामलालजी

नागपुरात संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग – २ (विशेष)चा शुभारंभ

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
नागपूर,
ramlalji राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग – २ (विशेष)चा शुभारंभ रविवारी सकाळी नागपुरातील स्मृतिभवन परिसरातील संत शिरोमणी रविदास सभागृहात झाला. या वर्गाचे पालक अधिकारी तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलालजी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा संघाच्या जयजयकारासाठी काम करत नाहीत, तर ते आयुष्यभर केवळ ‘भारत माता की जय’ या भावनेने कार्य करतात. देश आणि समाजाचा विचार करणारे नागरिक घडविणे, हेच संघाचे कार्य आहे.'
 
 
ramlalji
 
यावेळी मंचावर सहसरकार्यवाह मुकुंदजी आणि वर्गाचे सर्वाधिकारी तथा छत्तीसगड प्रांत संघचालक डॉ. टोपलाल वर्मा उपस्थित होते. भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन केल्यानंतर संघटनमंत्राने वर्गाचा औपचारिक शुभारंभ झाला. हा प्रशिक्षण वर्ग १६ डिसेंबरपर्यंत चालणार असून, त्यात देशभरातून ५०० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. रामलालजी म्हणाले, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पूजनीय डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांनी दूरदृष्टीने संघाची स्थापना केली. ब्रिटिश सत्तेविरुद्ध देशभरात सुरू असलेल्या संघर्षामुळे देशाला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित होते. मात्र, भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, या उद्देशाने संघाची स्थापना करण्यात आली.
 
 
देशाला अधिक चांगले बनविण्यासाठी नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती असणे आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान असावा, संपूर्ण समाजात एकता असावी आणि कोणताही भेदभाव नसलेले ‘भारत माता की जय’ हे एकच सूत्र असावे, ही बाब डॉ. हेडगेवार यांनी ओळखली होती. त्यामुळेच त्यांनी संघाची रचना याच विचारातून केली. संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासात अनेक संकटे आली. तीन वेळा संघावर बंदी घालण्यात आली, तरीही स्वयंसेवक विचलित झाले नाहीत. स्वयंसेवकांची कर्मठता, निष्ठा आणि चिवटपणा यामुळेच संघ आज इतका मोठा झाला आहे. संघाची कार्यपद्धती काळानुसार हळूहळू विकसित होत गेली. या कार्यपद्धतीत वेळोवेळी बदल होत असले, तरी संघाचा मूळ विचार आजही कायम आहे,' असेही त्यांनी सांगितले.
 
'प्रशिक्षणासाठी संकल्प आवश्यक'
उपस्थित कार्यकर्त्यांना प्रशिक्षण वर्गाचे महत्त्व समजावून सांगताना रामलालजी म्हणाले, 'येथे आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना संघाची माहिती आहे. त्यामुळे आता नवीन काय शिकायचे, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मात्र, संघाचा वैचारिक गाभा समजून घेण्यासाठी आणि त्यात प्रावीण्य मिळविण्यासाठी या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. संघाशी संबंधित प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास व्हावा, हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. ही एक प्रकारची साधना आहे. प्रशिक्षण योग्य पद्धतीने पूर्ण होण्यासाठी संकल्प आवश्यक आहे. पुढील २५ दिवस स्मृतिमंदिराच्या या पवित्र परिसरात प्रशिक्षण घेऊन आपण भारतमातेच्या सेवेसाठी अधिक सक्षम होऊ,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्ता विकास वर्ग – २ (विशेष)चा समारोप १६ डिसेंबर रोजी दीक्षांत समारंभानंतर होणार आहे.