अनिल कांबळे
नागपूर,
threatened-to-make-a-video-of-his-girlfriend-go-viral १६ वर्षीय प्रेयसीचे शारीरिक संबंध ठेवतानाचे मुलीचे अश्लील व्हिडीओ चित्रीत करून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळमना पोलिसांनी प्रियकर आयुष वंजारी (वय २०, रा. सुभाननगर, पारडी) याला अटक केली आहे. आरोपीने मुलीकडून ९८ हजार रुपये रोख आणि २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दागिने घेतल्याचा आरोप आहे. एकूण १ लाख २३ हजार रुपये उकळले.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलीची जून २०२६ मध्ये आयुषशी ओळख झाली. त्यानंतर आरोपी तिला अनेकदा बाहेर घेऊन गेला. यावेळी तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील व्हिडीओ चित्रीत केल्याचा आरोप आहे. पुढे हे व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी देत आरोपीने तिच्याकडे पैशांची मागणी सुरू केली. व्हिडीओ व्हायरल झाल्यास बदनामी होईल, या भीतीने मुलीने आरोपीला वेगवेगळ्या वेळी ९८ हजार रुपये दिले. तसेच सुमारे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दागिनेही त्याला दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरोपीच्या धमक्यांमुळे मुलगी सुरुवातीला हा प्रकार कोणालाही सांगू शकली नाही. अखेर तिने कुटुंबीयांना विश्वासात घेतले आणि २० नोव्हेंबर रोजी कळमना पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस), लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविला. लैंगिक शोषण, धमकी, खंडणी आणि लैंगिक स्वरूपाचा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यासंबंधीच्या आरोपांचा तपास सुरू आहे.