मुंबई,
yuzvendra-chahal-joins-bjpक्रिकेटच्या मैदानावर आपल्या फिरकीच्या जोरावर भल्याभल्या फलंदाजांना नाचवणारा भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आता राजकारणाच्या मैदानावर आपली नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. युजवेंद्र चहल याने शनिवारी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश करताच भाजपने चहलला मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपवली असून, त्याची भाजप ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 'विशेष निमंत्रित सदस्य' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपने शनिवारी आपल्या इतर मागासवर्गीय मोर्चाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन यांच्या निर्देशानुसार चहलची ओबीसी मोर्चामध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी चहलने भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार अमरपाल मौर्य यांची भेट घेतली होती.
अमरपाल मौर्य यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या यादीत चहलसह ओडिशाचे प्राध्यापक अद्वैत चरण गडनायक आणि उत्तर प्रदेशच्या अधिवक्ता सीमा समृद्धी कुशवाहा यांनाही विशेष निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. या नव्या कार्यकारिणीत सात राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि तीन राष्ट्रीय महासचिवांची नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये महाराष्ट्रातील बबनराव रावजी चौधरी यांची ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.