एआय आणि स्मार्ट तंत्रज्ञानातून शेतीत नवी क्रांती घडविण्याचा संकल्प !

नागपुरात २७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रीय कृषी प्रदर्शन

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
वाशीम,
ai-and-smart-technology शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि स्मार्ट तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडविण्याच्या उद्देशाने नागपुरात १७ व्या भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २७ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातील मैदान, अमरावती रोड येथे हे प्रदर्शन पार पडणार आहे. महाराष्ट्रासह विदर्भातील शेतकरी, कृषी उद्योजक, तरुण आणि महिला शेतकर्‍यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार अ‍ॅड. विजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले.
 
 
ai-and-smart-technology
 
हवामानातील बदल, अनियमित पाऊस, दुष्काळ, पाणीटंचाई, वाढता उत्पादन खर्च आणि शेतमालाच्या बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेती क्षेत्रासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. या परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक संशोधन आणि स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक फायदेशीर व शाश्वत करण्याची गरज असल्याचे जाधव यांनी नमूद केले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशन आणि एम. एम. अ‍ॅटिव्ह साय-टेक कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
यामध्ये ५०० हून अधिक सहभागी संस्था सहभागी होणार असून, कृषी क्षेत्रातील नामांकित कंपन्या, केंद्र व राज्य शासनाचे विभाग, संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे, सार्वजनिक उपक्रम, वित्तीय संस्था, कृषी स्टार्टअप्स, लघु व मध्यम उद्योग, स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत गटांचा समावेश राहणार आहे.शेतकर्‍यांना प्रत्यक्ष उपयोगी तंत्रज्ञानाची माहितीया प्रदर्शनाचा उद्देश केवळ कृषीविषयक माहिती देणे नसून प्रत्यक्ष शेतीमध्ये उपयोगी ठरणारे आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनाधारित शेती आणि शास्त्रीय पद्धतींची ओळख शेतकर्‍यांना करून देणे हा आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना नवनवीन तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि त्याचा शेतीत वापर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. शेतीला आधुनिकतेची जोड देऊन उत्पादन क्षमता वाढविणे आणि शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने अ‍ॅग्राव्हिजन २०२६ हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही माजी आमदार अ‍ॅड. विजय जाधव यांनी व्यक्त केला.