मुंबई
aadi anant हिंदी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर जोरदार स्पर्धा सुरू असतानाही पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांची पसंती मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने २.१६ कोटी रुपयांची कमाई केली असून, महाराष्ट्रात १ लाख २५ हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याच्या यशाची घोडदौड दुसऱ्या आठवड्यातही कायम आहे. प्रेक्षकांची वाढती मागणी लक्षात घेऊन चित्रपटाच्या शोची संख्याही वाढविण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, एकाच वेळी पाच मराठी चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर स्पर्धा सुरू असतानाही ‘आदि अनंत’ने दुसऱ्या आठवड्यात दमदार प्रवेश केला आहे. सध्या महाराष्ट्रातील सुमारे २०० चित्रपटगृहांमध्ये २५० हून अधिक शोद्वारे हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सातत्याने मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि समाधानकारक कमाई यामुळे चित्रपटाच्या संपूर्ण टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आजोबा आणि नातू यांच्यातील नात्याचे भावविश्व हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. या नात्यातील प्रेम, मतभेद, संवाद आणि एकमेकांविषयी असलेली ओढ यांचे संवेदनशील चित्रण कथेतून करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या अभिनयातील सहजता, दोघांमधील उत्तम जुळलेली केमिस्ट्री तसेच भावनिक प्रसंगांची प्रभावी मांडणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता कौटुंबिक नात्यांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची जाणीव करून देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडण्यात यशस्वी ठरत आहे.
चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक महेश लिमये यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “प्रेक्षकांनी ‘आदि अनंत’ला दिलेले प्रेम आणि प्रतिसाद मनापासून आनंद देणारा आहे. चित्रपटातील नात्यांचे भावविश्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असून, ते कथेशी भावनिकदृष्ट्या जोडले जात आहेत. आमच्यासाठी हीच सर्वांत मोठी पावती आहे.”
पहिल्या आठवड्यातील यशाबाबत निर्माते समीर हंपी यांनीही आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “पहिल्या आठवड्यात मिळालेले यश आमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे चित्रपटाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. दुसऱ्या आठवड्यातही २०० चित्रपटगृहांमध्ये आणि २५० हून अधिक शोमध्ये चित्रपट प्रदर्शित होत असल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. प्रेक्षकांचे हे प्रेम पुढेही असेच कायम राहील, अशी अपेक्षा आहे.”
निर्माते मुरलीधर छतवानी यांनीही मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “मराठी चित्रपटसृष्टीला प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम आणि सहकार्य नेहमीच नवी प्रेरणा देणारे असते. ‘आदि अनंत’लाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने समाधान वाटत आहे. पहिल्या आठवड्यातील यश आणि दुसऱ्या आठवड्यातही कायम असलेली लोकप्रियता पाहता चित्रपटाची ही घोडदौड पुढेही सुरू राहील, असा विश्वास आहे.”
पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह यांनी सहनिर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. महेश लिमये यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, कथा, पटकथा आणि संवादलेखनाची धुरा संकर्षण कऱ्हाडे यांनी सांभाळली आहे. मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर ‘आदि अनंत’ची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी लक्षवेधी ठरत आहे.