तभा वृत्तसेवा
आर्णी,
illegal sand mining अवैध रेती व्यवसायाला आळा घालण्यासाठी आर्णी महसूल प्रशासनाने शनिवार, 21 नोव्हेंबरला धडक कारवाई केली. उपविभागीय अधिकारी गंगाधर होवाळे यांनी चिमटा परिसरात पहाटेपासूनच गोपनीय पाळत ठेवून सकाळी 7.30 वाजता 6 वाहने जप्त केली. महसूल भरारी पथकाच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे अवैध रेती व्यवसायींमध्ये मोठीच खळबळ आहे. आर्णी तालुक्यातील चिमटा परिसरात अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय अधिकारी कार्यालयाने (एसडीओ) कोणताही विलंब न करता तत्काळ कारवाईचे नियोजन केले.
संबंधितांना कारवाईची चाहूल लागू नये, यासाठी पहाटे 5.30 पासूनच पथकाने परिसरात अत्यंत गोपनीय पद्धतीने पाळत ठेवली. तब्बल दोन तासांच्या नियोजनबद्ध हालचालींनंतर एसडीओ गंगाधर होवाळे यांनी स्वतः पथकासह घटनास्थळी थेट धडक दिली.
या मोहिमेत अवैध रेती व्यवसायाशी संबंधित गोलू लकडे, किशोर राठोड, सनम तवर, राहुल मुनेश्वर, सिराज सर्वे व अरबाज तवर यांच्या मालकीचे वाळूने भरलेले सहा ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आले. महसूल पथकाने तत्काळ कारवाई करीत सहाही ट्रॅक्टर जप्त केले.
या अचूक रणनीतीमुळे महसूल विभागाला बेकायदेशीर वाहतूक रोखण्यामध्ये मोठे यश प्राप्त झाले आहे. अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे सातत्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. त्याचबरोबर अनधिकृत उपशामुळे नदीपात्राचे नैसर्गिक संतुलन पूर्णपणे बिघडून स्थानिक पर्यावरणावरही अत्यंत गंभीर परिणाम होत असतात.
अशा कृत्यांना आळा घालणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याने महसूल विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.illegal sand mining तक्रारींची वाट न पाहता प्रत्यक्ष पाळत ठेवून केलेली कारवाई प्रशासनाच्या सक्रियतेचे दर्शन घडवणारी ठरली.
या कारवाईमध्ये एसडीओ गंगाधर होवाळे यांच्यासोबत निवासी नायब तहसीलदार उदय तुंडलवार, नायब तहसीलदार डॉ. संतोष आदमुलवाड, मंडळ अधिकारी दिगांबर डोलारकर, संजय सप्परवार, तलाठी प्रकाश राऊत, सूरज चव्हाण व अमोल पुरी, पोलिस, कोतवाल आणि कपिल जाधव यांचा सहभाग होता.