नवी दिल्ली,
bisleri bottled water बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेवरून बिस्लेरी इंटरनॅशनल आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्यात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. कंपनीच्या गोवा येथील प्रकल्पातून घेतलेले पाण्याचे नमुने सुरुवातीच्या तपासणीत असुरक्षित ठरवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये हे नमुने अन्न सुरक्षा मानकांशी सुसंगत असल्याचे आढळल्याचा दावा बिस्लेरीने केला आहे. त्यामुळे कंपनीला काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर देशभरातील पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ब्रँड्सच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची तयारी संबंधित यंत्रणांनी सुरू केल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
बिस्लेरीच्या स्पष्टीकरणानुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये गोवा प्रकल्पात तयार झालेल्या एका विशिष्ट बॅचच्या पाण्याचे FSSAI ने सहा नमुने घेतले होते. त्यापैकी पाच नमुने निर्धारित निकषांनुसार योग्य ठरले, तर एका नमुन्यात ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले. या निष्कर्षाला कंपनीने आव्हान दिल्यानंतर संबंधित नमुना संदर्भ प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला. तेथील तपासणीत ब्रोमेटचे प्रमाण अनुमत मर्यादेत असल्याचे आढळल्याचे कंपनीने म्हटले. मात्र, त्याच नमुन्यात पॉलीसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) आढळल्याची नोंदही करण्यात आली. त्यानंतर FSSAI मान्यताप्राप्त दुसऱ्या प्रयोगशाळेत केलेल्या स्वतंत्र तपासणीतही ब्रोमेटचे प्रमाण मर्यादेत असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा बिस्लेरीने केला आहे.
कंपनीने हे तपासणी अहवाल फेब्रुवारी २०२६ मध्ये नियामक संस्थेकडे सादर केले होते. त्यानंतर कोणतीही सूचना किंवा पुढील माहिती मिळाली नसल्याने प्रकरण निकाली निघाल्याचा कंपनीचा समज झाला होता. मात्र, यापूर्वी FSSAI ने नमुना असुरक्षित घोषित करून संबंधित बॅच परत मागवण्याचे आदेश दिले होते आणि कायदेशीर कारवाईलाही मंजुरी दिली होती. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर देशातील इतर बाटलीबंद पाण्याच्या ब्रँड्सचीही गुणवत्ता तपासली जाणार आहे.bisleri bottled water दुसरीकडे, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात FSSAI ची कारवाई सुरूच आहे. वसंत मसाला प्रायव्हेट लिमिटेड, टिट-बिट फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मीमांसा इंडस्ट्रीज आणि आशा कन्फेक्शनरी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच उर्मी लाइफसायन्सेस एलएलपी आणि गौर आयुर्वेदिक स्टोअर यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आशा कन्फेक्शनरीच्या पॅकबंद चॉकलेट कुकीज असुरक्षित आढळल्याने त्या बाजारातून परत मागवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.