नवी दिल्ली
bisleri water controversy देशातील प्रसिद्ध बाटलीबंद पाणी उत्पादक कंपनी बिसलेरीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंपनीच्या बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा नमुना तपासणीत असुरक्षित आढळल्याने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. या कारवाईनंतर बिसलेरी कंपनीने आपली बाजू मांडत पाणी पिण्यास पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

या प्रकरणी FSSAI कडून नोटीस मिळाल्यानंतर कंपनीने स्पष्टीकरण दिले. बिसलेरीच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रकरण सुमारे १४ महिन्यांपूर्वीचे आहे. या घटनेनंतर कंपनीने २ फेब्रुवारी २०२६ रोजी तपासणीचा अहवाल FSSAI कडे सादर केला होता. मात्र, अहवाल सादर केल्यानंतर प्राधिकरणाकडून कोणतीही पुढील सूचना किंवा माहिती मिळाली नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आपल्या उत्पादनाच्या सुरक्षिततेबाबत ग्राहकांनी चिंता करू नये, असा विश्वास देण्याचा प्रयत्न बिसलेरीने केला आहे. कंपनीने आपले पाणी पिण्यास पूर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. मात्र, तपासणीत नमुना असुरक्षित आढळल्याचा मुद्दा आणि त्यानंतर FSSAI ने घेतलेली कारवाई यामुळे बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेचा आणि ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.