दिलजीत दोसांजच्या मुंबईतील कॉन्सर्टला बॉम्बस्फोटाची धमकी

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
मुंबई
diljit dosanjh concert
प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज याच्या मुंबईतील आगामी म्युझिकल कॉन्सर्टला बॉम्बस्फोट घडवून उडविण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. येत्या २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे दिलजीत दोसांज याचा भव्य संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, कार्यक्रमाच्या काही दिवस आधीच ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’च्या नावाने धमकीचा संदेश आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी गंभीर दखल घेत सतर्कता वाढविली आहे.



पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाला प्राप्त झालेल्या धमकीच्या संदेशामध्ये दिलजीत दोसांज याच्या कॉन्सर्टचा उल्लेख करण्यात आला आहे. २७ नोव्हेंबरला महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणारा हा कार्यक्रम बॉम्बस्फोट घडवून उद्ध्वस्त करण्याचा इशारा या संदेशातून देण्यात आल्याचे समजते. दिलजीतच्या कार्यक्रमांना देशभरातून हजारो चाहत्यांची उपस्थिती असते. त्यामुळे या धमकीमुळे कार्यक्रमाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, पुणे जिल्हा व सत्र न्यायालयालाही सोमवारी (२३ नोव्हेंबर) पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला. न्यायालय परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा या संदेशातून करण्यात आल्याने न्यायालयीन वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या ई-मेलची माहिती तातडीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (पीडीजे) यांना देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि कार्यकारिणीने तातडीने निवेदन प्रसिद्ध केले. न्यायालयात उपस्थित असलेले सर्व वकील, बार असोसिएशनचे सदस्य, पक्षकार तसेच नागरिकांनी घाईगडबड न करता न्यायालय परिसर त्वरित रिकामा करून सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच पोलिस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचेही आवाहन असोसिएशनने केले आहे.दिलजीत दोसांजच्या मुंबईतील कार्यक्रमाला मिळालेली धमकी आणि पुणे न्यायालयाला प्राप्त झालेला बॉम्बस्फोटाचा ई-मेल या दोन्ही घटनांमुळे सुरक्षा व्यवस्थेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. या धमकी संदेशांची गंभीरता लक्षात घेऊन संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.