नवी दिल्ली,
kartik purnima कार्तिक पौर्णिमा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी स्नान, पूजन आणि दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा केल्याने पुण्यप्राप्ती होते. तसेच श्रद्धेने आणि मनापासून केलेल्या दानामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यंदा २४ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. द्रिक पंचांगानुसार, पौर्णिमा तिथीला २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ४२ मिनिटांनी सुरुवात होईल, तर २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून २३ मिनिटांनी तिची समाप्ती होईल. उदया तिथीनुसार २४ नोव्हेंबरला स्नान आणि दानधर्म केला जाईल. या दिवशी सायंकाळी दीपदान करण्याचीही परंपरा आहे.
अन्नदानाला विशेष महत्त्व
कार्तिक पौर्णिमेला अन्नदान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. गरजू आणि भुकेल्या व्यक्तींना अन्न देणे हे श्रेष्ठ दान असल्याची धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी तांदूळ, गहू, पीठ, डाळी किंवा तयार अन्न गरजूंना देता येते. यासोबतच हिवाळ्याची सुरुवात लक्षात घेता गरजू व्यक्तींना स्वच्छ आणि वापरण्यायोग्य उबदार कपडे, चादरी किंवा ब्लँकेट दान करणेही शुभ मानले जाते. अशा मदतीमुळे गरजूंची आवश्यकता पूर्ण होण्यास हातभार लागतो.
तीळ आणि दीपदानाचे महत्त्व
हिंदू धर्मात तीळ दानालाही विशेष धार्मिक महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला काळे किंवा पांढरे तीळ तसेच तिळापासून तयार केलेले पदार्थ दान करण्याची प्रथा आहे. धार्मिक समजुतीनुसार, तीळदानामुळे नकारात्मकता दूर होऊन जीवनात शांतता टिकून राहते. त्याचप्रमाणे या दिवशी मंदिरात तूप आणि दिव्यांचे दान करणे तसेच सायंकाळी दीपदान करणे शुभ मानले जाते. मंदिरांमध्ये आणि पवित्र नद्यांच्या काठावर दिवे प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा लाभते, अशी श्रद्धा आहे.
क्षमतानुसार धनदान करा
कार्तिक पौर्णिमेला धनदान करणेही पुण्यकारक मानले जाते. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार गरजू, गरीब किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तींना मदत करता येते. एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावणे किंवा आवश्यक वस्तू उपलब्ध करून देणे हेदेखील दानाचेच स्वरूप आहे. मात्र, दान करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. दान केवळ दिखाव्यासाठी न करता श्रद्धेने आणि आनंदाने करावे.kartik purnima आपल्या आवाक्यानुसारच मदत करावी. तसेच मदत स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा कोणत्याही प्रकारे अपमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. धार्मिक मान्यतेनुसार, मोठ्या दानापेक्षा शुद्ध भावनेने केलेल्या छोट्याशा मदतीलाही विशेष महत्त्व असते.