मुंबई
eisha singh टेलिव्हिजन विश्वातील अभिनेत्री ईशा सिंह सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता अविनाश मिश्रा आणि ईशा सिंह यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच ईशाने सोशल मीडियावर केलेल्या एका भावनिक आणि संतप्त पोस्टमुळे या चर्चांना आणखी वेग आला आहे. विश्वासघात, खासगी नात्यांचा आदर आणि स्वतःची बाजू मांडण्याबाबत तिने या पोस्टमधून स्पष्ट भूमिका मांडली आहे. तिच्या विधानांमुळे दोघांच्या नात्यातील दुराव्याच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे.

ईशाने आपल्या पोस्टमध्ये शांत राहण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याचा अर्थ आपली बाजू मांडण्याची क्षमता नसल्याचा होत नाही, असे स्पष्ट केले आहे. स्वतःच्या मानसिक शांततेचे रक्षण करण्यासाठी आपण मौन बाळगले आहे; मात्र गरज पडल्यास सत्य समोर मांडण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा सूचक इशाराही तिने दिला आहे.
याशिवाय, वैयक्तिक नात्यांना सार्वजनिक मनोरंजनाचा विषय बनवणाऱ्यांवरही ईशाने नाराजी व्यक्त केली आहे. खासगी आयुष्य आणि नातेसंबंध यांचा आदर केला पाहिजे, असे सांगणाऱ्या व्यक्तींनीच दुसरीकडे त्याच गोष्टींची खिल्ली उडवणे हा दुटप्पीपणा असल्याचे तिने म्हटले आहे. एका बाजूला खासगीपणाचा पुरस्कार करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याच विरोधात वागायचे, ही भूमिका योग्य नसल्याचेही तिने आपल्या पोस्टमधून सुनावले.
ईशाने आपल्या पोस्टमध्ये पुराव्यांचा उल्लेख करत आणखी एक गंभीर इशारा दिला आहे. मला अशा परिस्थितीत आणू नका, जिथे संबंधित व्यक्तींची नावे घेऊन प्रत्येक गोष्टीचे पुरावे सार्वजनिक करावे लागतील, अशा आशयाचे विधान तिने केले आहे. त्याचे परिणाम काहीही झाले तरी सर्व सत्य समोर आणण्याची वेळ माझ्यावर आणू नका, असेही तिने सूचित केले. त्यामुळे तिच्या या पोस्टमागे नेमकी कोणती घटना आहे, याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.पोस्टमधील सर्वाधिक लक्षवेधी विधान म्हणजे विश्वासघाताबद्दल तिने व्यक्त केलेली भावना. आयुष्यात एका व्यक्तीवर विश्वास ठेवून आपण मोठी चूक केली आणि शेवटी त्याच व्यक्तीने पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दांत तिने आपली नाराजी व्यक्त केली आहे. काही लोकांसाठी नात्यातून बाहेर पडून आयुष्यात पुढे जाणे सहज शक्य असते. त्यामुळे आता आपणही भूतकाळ मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तिने म्हटले आहे.
ईशाच्या या पोस्टचा संबंध अविनाश मिश्रासोबतच्या कथित ब्रेकअपशी जोडला जात आहे. मात्र, तिने आपल्या पोस्टमध्ये अविनाशचा थेट उल्लेख केलेला नाही. तसेच दोघांचे नाते संपुष्टात आल्याचेही अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या तिच्या पोस्टवरून व्यक्त केल्या जाणाऱ्या अंदाजांपुरत्याच मर्यादित आहेत. याआधी अविनाशनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून नेटकऱ्यांना आपल्या खासगी आयुष्याचा आदर करण्याचे आवाहन केले होते.ईशा आणि अविनाश यांची ओळख सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस १८’ या रिअॅलिटी शोदरम्यान झाली होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमात दोघांची मैत्री झाली. त्यांच्यातील जवळीक आणि एकमेकांसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. कार्यक्रम संपल्यानंतरही दोघे अनेकदा एकत्र दिसले. एवढेच नव्हे, तर ‘काला छा काला’, ‘आओ ना’ आणि ‘हीरिये’ यांसारख्या म्युझिक व्हिडीओंमध्येही त्यांनी एकत्र काम केले. त्यांच्या या जवळिकीमुळे दोघे प्रेमसंबंधात असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.आता ईशाच्या सूचक पोस्टनंतर या नात्याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, दोघांपैकी कुणीही ब्रेकअपबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली नसल्याने त्यांच्या नात्याचे नेमके वास्तव काय, हे अद्याप समोर आलेले नाही.