हिंदुकुश
rainfall warning हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतासह दक्षिण आशियातील अनेक देशांसमोर नैसर्गिक संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हिंदुकुश-हिमालयीन प्रदेशात यंदा सामान्यपेक्षा अधिक पाऊस आणि हिमवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा परिणाम नेपाळपुरता मर्यादित न राहता भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशसह आसपासच्या देशांवरही होऊ शकतो. अतिवृष्टी आणि मोठ्या प्रमाणातील हिमवृष्टीमुळे पूर, भूस्खलन आणि हिमस्खलनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एल निनोच्या संभाव्य प्रभावाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, हिंदुकुश-हिमालयीन प्रदेशात एल निनोशी संबंधित हवामान बदलांचा परिणाम जाणवू शकतो. या भागात हिवाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विशेषतः नेपाळमध्ये पूर, भूस्खलन आणि हिमस्खलनाच्या घटनांचा धोका वाढू शकतो. मात्र, या संकटाचे परिणाम केवळ नेपाळपुरते मर्यादित राहणार नसून त्याचा फटका भारतालाही बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या संदर्भातील अहवालाला ‘हिंदुकुश हिमालय हिवाळी दृष्टिकोन २०२६’ असे नाव देण्यात आले आहे. काठमांडूस्थित इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट, बीजिंग नॉर्मल युनिव्हर्सिटी आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲटमॉस्फेरिक फिजिक्स या संस्थांनी संयुक्तपणे हा अहवाल तयार केला आहे.
अहवालात भारत, नेपाळ, अफगाणिस्तान आणि बांगलादेशसह अनेक देशांमध्ये पाऊस व हिमवृष्टीचे प्रमाण वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या हवामान संकटाचा परिणाम प्रामुख्याने नेपाळमध्ये दिसून आला होता. मात्र, यंदा त्याची व्याप्ती अधिक मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानलाही या बदलत्या हवामानाचा सामना करावा लागू शकतो.
विशेषतः उत्तर भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि नेपाळमधील काही भागांत यंदा बर्फाचा थर नेहमीपेक्षा अधिक जाड होण्याची शक्यता अहवालात नमूद करण्यात आली आहे. दुसरीकडे, भूतान आणि पूर्व तिबेटमधील काही भागांत बर्फाचे आच्छादन सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.
हिमवृष्टी आणि पावसाचे प्रमाण वाढल्यास हिमालयीन प्रदेशातील नद्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. परिणामी, नदीकाठच्या भागांना पूरस्थितीचा सामना करावा लागू शकतो. डोंगराळ प्रदेशांत भूस्खलन आणि हिमस्खलनाचा धोका वाढण्याचीही शक्यता आहे. काही भागांत अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव जागतिक हवामानावर पडत असतो. त्याचा पर्जन्यमानावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आगामी हिवाळ्यातील हवामानाचे स्वरूप कसे राहते आणि हिंदुकुश-हिमालयीन प्रदेशातील संभाव्य बदल प्रत्यक्षात कितपत जाणवतात, याकडे भारतासह संबंधित देशांचे लक्ष लागले आहे.