कर्जफेडीच्या चिंतेतून शेतकऱ्याची आत्महत्या

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर
farmer
मराठवाड्यात एकीकडे दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे घडली आहे.



बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या आर्थिक विवंचनेतून ४४ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नंदू ऊर्फ अनिल किसनराव सोमवंशी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य झोपल्यानंतर त्यांनी घरातच आपले जीवन संपवले.

शनिवारी सकाळी ही घटना त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आली. पतीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आक्रोश केला. आवाज ऐकून शेजारी घटनास्थळी धावले. त्यांनी सोमवंशी यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.सोमवंशी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.