‘फॉकर इन-लॉ’मधून केविन रॉलीचे पुनरागमन

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
मुंबई
owen wilson
चित्रपटांमधील काही व्यक्तिरेखा कथानक संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम राहतात. आपल्या विनोदी स्वभावामुळे आणि सहजसुंदर अभिनयामुळे लोकप्रिय ठरलेली केविन रॉली ही व्यक्तिरेखाही त्यापैकीच एक आहे. अभिनेता ओवेन विल्सन आता ‘फॉकर इन-लॉ’ या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा केविनच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मीट द पॅरेंट्स’ या गाजलेल्या चित्रपट मालिकेच्या नव्या भागामुळे जुन्या व्यक्तिरेखांचे पुनरागमन होणार असून, त्यात नव्या कलाकारांचीही भर पडणार आहे.



यापूर्वी पॅम फॉकर (टेरी पोलो) हिच्याशी विवाह करण्याच्या उंबरठ्यावर असलेला केविन अखेर ग्रेग फॉकर (बेन स्टिलर) याच्यामुळे तिच्यापासून दूर राहिला. पॅम हेच आपल्या आयुष्यातील खरे प्रेम असल्याची भावना असलेल्या केविनला ग्रेगने मागे टाकले असले, तरी त्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. आता मात्र केविनच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित बदल घडले आहेत. क्रिप्टोकरन्सीमधील अनपेक्षित आर्थिक यशामुळे तो प्रचंड श्रीमंत झाला आहे. हेन्री फॉकरचा (स्कायलर गिसोंडो) गॉडफादर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा केविन फॉकर आणि बायर्न्स कुटुंबाला ‘ले टूर डी जॅक्स’ या सायकल सफरीसाठी आमंत्रित करतो. याशिवाय, आपल्या होऊ घातलेल्या सासऱ्याच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त एका खास भोजन समारंभाचे आयोजन करण्याची योजनाही तो आखतो. या घडामोडींमधून चित्रपटात विनोदाची नवी रंगत पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचा भाग होण्याबाबत ओवेन विल्सननेही उत्साह व्यक्त केला आहे. पटकथा वाचताच आपण या प्रकल्पाशी जोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. त्याच्या मते, ही त्याने आजवर वाचलेल्या सर्वाधिक विनोदी पटकथांपैकी एक आहे. त्यावेळी ऑस्ट्रेलियात फिरत असताना त्याने ही पटकथा वाचली होती. वाचन पूर्ण होताच त्याने दिग्दर्शक जॉन हॅम्बर्ग यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. चित्रपटातील विविध प्रसंग आणि त्यांमधील विनोद याबद्दल आपण बराच वेळ बोलत राहिलो, असे विल्सनने सांगितले. आपले बोलणे ऐकून दिग्दर्शकाला कदाचित फोनवरील संभाषण लवकर संपवावेसे वाटले असावे, अशी मिश्कील टिप्पणीही त्याने केली.

या नोव्हेंबरमध्ये विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला बेन स्टिलर आणि ज्येष्ठ अभिनेते रॉबर्ट डी निरो पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. त्यांच्यासोबत लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री एरियाना ग्रांडे हिचीही महत्त्वपूर्ण भूमिका असेल. ‘मीट द पॅरेंट्स’ या ब्लॉकबस्टर चित्रपट मालिकेचा पुढील भाग असलेल्या ‘फॉकर इन-लॉ’मध्ये ब्लाइथ डॅनर, टेरी पोलो, स्कायलर गिसोंडो, बिनी फेल्डस्टीन आणि एडुआर्डो फ्रँको हे कलाकारही विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन जॉन हॅम्बर्ग यांनी केले आहे. ‘मीट द पॅरेंट्स’ मालिकेतील यापूर्वीच्या तिन्ही चित्रपटांच्या लेखन प्रक्रियेतही त्यांचा सहभाग होता. ऑस्कर नामांकित जेन रोझेंथल आणि रॉबर्ट डी निरो यांनी ट्रायबेका प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर बेन स्टिलर आणि ऑस्कर विजेते जॉन लेशर यांनी रेड अवर फिल्म्सच्या वतीने निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.

पॅरामाउंट पिक्चर्सच्या वतीने ‘फॉकर इन-लॉ’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जुन्या परिचित व्यक्तिरेखांचे पुनरागमन, नामवंत कलाकारांची मांदियाळी आणि विनोदी कथानक यामुळे या चित्रपटाकडे ‘मीट द पॅरेंट्स’ मालिकेच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.