कारंजा बाजार समितीत कापूस लिलावाचा शुभारंभ

मुहूर्ताला ९४०० रुपयांचा भाव

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
कारंजा लाड,
inauguration-of-cotton-auctions खरीप हंगामातील कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांसाठी दिलासादायक ठरलेल्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीतील कापूस लिलावाचा सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी उत्साहात शुभारंभ करण्यात आला. बाजार समितीच्या यार्ड क्रमांक २ वरील गाळा क्रमांक ९ येथे सुरू झालेल्या या लिलाव प्रक्रियेच्या मुहूर्तावरच कापसाला प्रतिक्विंटल ९ हजार ४०० रुपयांचा भाव मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
inauguration-of-cotton-auctions
 
आमदार तथा बाजार समितीच्या सभापती सई प्रकाश डहाके यांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सचिव, संचालक, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, अडते तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते. कारंजा तालुयासह परिसरातील अनेक गावामध्ये कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांनी मोठ्या अपेक्षेने कापसाची लागवड केली. मात्र, बदलते हवामान, पावसातील अनियमितता आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत बाजार समितीमध्ये अधिकृत कापूस लिलाव सुरू झाल्याने शेतकर्‍यांना आपला कापूस विक्रीसाठी स्थानिक पातळीवर हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
 
 
विशेष म्हणजे, लिलावाच्या पहिल्याच दिवशी मुहूर्ताचा भाव प्रतिक्विंटल ९ हजार ४०० रुपये मिळाल्याने आगामी कापूस हंगामाबाबत शेतकर्‍यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. बाजार समितीतील खुल्या लिलाव प्रक्रियेमुळे विविध खरेदीदारामध्ये स्पर्धा निर्माण होऊन कापसाला चांगला दर मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. बाजार समिती प्रशासनाच्या वतीने कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी आपला कापूस स्वच्छ व योग्य प्रकारे वाळवून बाजार समितीच्या यार्ड क्रमांक २ मध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकर्‍यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा आणि विक्री प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी बाजार समिती प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
 
बाजार समितीकडून शेतकर्‍याचा सत्कार
कारंजा बाजार समिती सोमवारी कापूस लिलावाचा शुभारंभ झाला यावेळी कापूस विक्रीसाठी आणणारे पसरणी येथील शेतकरी दिलीप साबळे यांचा बाजार समितीच्या वतीने केला टोपी आणि नारळ देऊन सत्कार करण्यात आला. मुहूर्तालाच ९४०० रुपयांचा भाव मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, आगामी काळात कापसाचे दर कोणती दिशा घेतात, याकडे संपूर्ण तालुयातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.