नवी दिल्ली,
india-vs-uae-match-today आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारताच्या पुढील फेरीतील प्रवेशाचा मार्ग आव्हानात्मक झाला आहे. मात्र, भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान अद्याप संपलेले नाही. पुढील फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारत-अ संघाला आता यूएईविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. हा महत्त्वाचा सामना २४ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार असून, क्रिकेटप्रेमींना तो टीव्ही आणि मोबाईलवर थेट पाहता येणार आहे.
भारत-अ आणि यूएई यांच्यातील हा सामना दोहा येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल, तर नाणेफेक सकाळी ११ वाजता होणार आहे. भारताचे यापूर्वीचे दोन्ही सामने दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरू झाले होते. मात्र, यावेळचा सामना सकाळच्या सत्रात असल्याने प्रेक्षकांनी सामन्याच्या वेळेची नोंद घेणे आवश्यक आहे.
सोनी स्पोर्ट्स आणि सोनी लिव्हवर पाहता येणार सामना
भारत आणि यूएई यांच्यातील लढत पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कचा पर्याय उपलब्ध आहे. या स्पर्धेचे प्रसारण हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे असल्याने टीव्हीवर सामना पाहणाऱ्यांना सोनी स्पोर्ट्सच्या चॅनेलवर थेट प्रक्षेपण पाहता येईल. तर मोबाईलवर सामना पाहण्यासाठी सोनी लिव्ह ॲपचा वापर करता येईल. लॅपटॉप आणि टॅब्लेटवरही सोनी लिव्हच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेता येणार आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या चुका सुधारण्याचे भारतासमोर आव्हान
यूएईविरुद्ध भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात असले, तरी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील चुका सुधारण्याची गरज आहे. त्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. पाकिस्तानने भारतासमोर ३१३ धावांचे मोठे आव्हान उभे केले होते. त्यानंतर फलंदाजांनाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आगामी सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांत सुधारणा करून विजय मिळवण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल.
भारत-अ संघाचे नेतृत्व तिलक वर्मा करणार आहे. संघात वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, कुमार कुशाग्र, रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्षित राणा, प्रिन्स यादव, हर्ष दुबे, प्रभश खान आणि अरशद खान यांचा समावेश आहे. यूएई संघाचे नेतृत्व बासिल हमीदकडे असून, आर्यनश शर्मा, अंश टंडन, हरप्रीत सिंग भाटिया, मोहम्मद शहदाद, एम. आफताब आलम, एथन डिसोझा, नुरुल्ला अयुबी, उदीश सुरी, इब्रार अहमद, मोहम्मद मोहसीन, सोहेब खान आणि ए. रहमान अली शाह यांचा संघात समावेश आहे.