गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; २३ जण भाजले

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
उत्तर प्रदेश
gas cylinder blast
उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात रविवारी सायंकाळी घरगुती गॅस सिलिंडरला आग लागल्यानंतर झालेल्या भीषण स्फोटात २३ जण भाजून जखमी झाले. जखमींमध्ये पाच महिला, पाच पुरुष आणि १३ लहान मुलांचा समावेश आहे. गंभीररीत्या भाजलेल्या १३ जणांना पुढील उपचारांसाठी झाशी येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले असून, उर्वरित जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर झाल्यास त्यांनाही अन्यत्र हलवण्यात येऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, सदरचे आमदार गौरी शंकर वर्मा यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.



ही घटना उरई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतिनगर परिसरात घडली. सभासद माता प्रसाद यांच्या घरी रविवारी सायंकाळी कुटुंबातील सदस्य स्वयंपाक करत असताना घरगुती गॅस सिलिंडरला अचानक आग लागली. सुरुवातीला कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही समजण्यापूर्वीच आगीने रौद्र रूप धारण केले आणि सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की सिलिंडरचे तुकडे आजूबाजूला फेकले गेले. घरातील सदस्यांसह परिसरातील शेजारीही या घटनेच्या तडाख्यात सापडले.

स्फोटाचा मोठा आवाज ऐकून संपूर्ण परिसरात घबराट पसरली. काही क्षणांतच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरू करून सर्व जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल केले. अलीकडेच दिव्याच्या ज्योतीच्या संपर्कात आल्याने गॅस सिलिंडरला आग लागल्याचा एक व्हिडिओही समोर आला होता.

या दुर्घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना जिल्हा रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत जखमींची विचारपूस केली. पोलीस अधीक्षकांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सिलिंडरला आग नेमकी कशामुळे लागली आणि त्यानंतर स्फोट कसा झाला, याचा तपास पोलीस तसेच संबंधित विभागांच्या पथकांकडून सुरू आहे. या घटनेमुळे शांतिनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जालौनमधील दुर्घटनेची दखल घेतली आहे. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच पीडित कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या असून, जखमी लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.