‘झिम्मा ३’मध्ये पुरुषांची धमाल सहल

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
मुंबई
jhimma 3
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’च्या यशानंतर आणि ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ या चित्रपटांमधून महिलांच्या सहलीतील मैत्री, नातेसंबंध आणि स्वभाववैशिष्ट्यांचे मनोरंजक दर्शन घडवल्यानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘झिम्मा ३’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर नवी संकल्पना घेऊन येत आहेत. यावेळी महिलांच्या सहलीऐवजी पुरुषांची धमाल टोळी प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. ‘सहलीला जायचं, जायचं सहलीला’ असा उत्साह व्यक्त करत ही पुरुष मंडळी थेट श्रीलंकेच्या सफरीवर निघाली आहेत. विशेष म्हणजे, लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे यावेळी अभिनयही करणार असून, ते स्वतः या धमाल टोळीचा भाग बनले आहेत.



प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये या अनोख्या सहलीची झलक पाहायला मिळते. प्रत्येकाची वृत्ती, विचार करण्याची पद्धत आणि जगण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्याचे यातून स्पष्ट होते. कोणी प्रचंड उत्साही, तर कोणी गंभीर; कुणाचा स्वभाव मिश्कील, तर कुणाची वागण्याची तऱ्हाच निराळी. वय, पार्श्वभूमी आणि स्वभावातील भिन्नता असलेल्या या मंडळींची एका सहलीच्या निमित्ताने गाठ पडते. अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांना एकाच प्रवासात एकत्र आणल्यानंतर कोणत्या गंमतीजमती घडणार, कोण कोणाशी जुळवून घेणार आणि कोणाच्या स्वभावामुळे इतरांची तारांबळ उडणार, याची उत्सुकता टीझरने वाढवली आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, राजन भिसे, उदय सबनीस, सुयोग गोऱ्हे, अर्चित देवधर, सिद्धेश धुरी आणि अमेय वाघ अशी कलाकारांची मोठी फळी पाहायला मिळणार आहे. ‘झिम्मा’च्या पहिल्या दोन भागांमध्ये महिलांच्या सहलीच्या माध्यमातून मैत्री, नातेसंबंध आणि भावनिक गुंतागुंतीचे विविध पैलू उलगडले होते. आता पुरुषांच्या सहलीतून त्यांच्यातील मैत्री, स्वभावातील विविधता आणि एकमेकांशी जुळवून घेताना घडणारे विनोदी प्रसंग पडद्यावर साकारले जाणार आहेत. श्रीलंकेतील निसर्गरम्य ठिकाणे, कलाकारांमधील रंगणारी जुगलबंदी आणि अनपेक्षित घडामोडी यामुळे हा चित्रपट मनोरंजनाची नवी पर्वणी ठरण्याची अपेक्षा आहे. येत्या १ जानेवारी २०२७ रोजी नववर्षाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाच्या संकल्पनेविषयी दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्यामुळे तिसऱ्या भागासाठी काहीतरी वेगळे सादर करण्याची इच्छा होती. महिलांच्या सहलीतून नात्यांचे अनेक सुंदर पैलू मांडल्यानंतर यावेळी पुरुषांच्या सहलीतून त्यांचे वेगवेगळे स्वभाव, गंमतीजमती आणि धमाल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा अभिनय करण्याची संधी मिळत असल्याने हा अनुभव माझ्यासाठी विशेष आहे. वेगवेगळ्या स्वभावांची माणसे एकत्र आल्यावर पडद्यावर कोणती रंगत निर्माण होते, हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल. मात्र, हा चित्रपट केवळ तिचा किंवा त्याचा न राहता सर्वांचाच होतो.”

निर्मात्या क्षिती जोग यांनीही चित्रपटाच्या नव्या संकल्पनेविषयी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, “‘झिम्मा’च्या दोन्ही भागांना मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे तिसरा भाग साकारताना प्रेक्षकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन काहीतरी नवीन देण्याचा आमचा प्रयत्न होता. यावेळी पुरुषांची टोळी आणि श्रीलंकेची सहल हा वेगळाच अनुभव असणार आहे. प्रत्येक कलाकाराचा स्वभाव आणि त्यांच्यातील परस्पर केमिस्ट्रीमधून चित्रपटात वेगळीच धमाल निर्माण होईल. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहात एकत्र हसण्याचा आणि आनंद लुटण्याचा अनुभव देता येईल. आपला आनंदाचा खेळ यावेळी अधिक मनोरंजक पद्धतीने सादर होणार आहे.”

निर्मात्या फाल्गुनी पटेल यांनी या चित्रपट मालिकेचा भाग होता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे चित्रपट देणारे हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांच्या लोकप्रिय ‘झिम्मा’ मालिकेच्या तिसऱ्या भागाशी जोडले जाणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. ‘हिरकणी’ या मराठी चित्रपटाच्या यशानंतर आमचा इरादा स्टुडिओज यावेळी एका वेगळ्या संकल्पनेसह ‘झिम्मा ३’च्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नवी मेजवानी घेऊन येत आहे.”

लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या ‘झिम्मा ३’ची निर्मिती क्षिती जोग आणि फाल्गुनी पटेल यांनी केली आहे. इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटातून ‘झिम्मा’ मालिकेचा प्रवास आता पुरुषांच्या अनोख्या सहलीपर्यंत पोहोचणार आहे. आतापर्यंत महिलांच्या सहलीतील भावविश्व आणि धमाल अनुभवलेल्या प्रेक्षकांना आता श्रीलंकेच्या पार्श्वभूमीवर रंगणारी पुरुषांची ही मैत्री, त्यांच्यातील मतभेद आणि विनोदी प्रसंग अनुभवता येणार आहेत. त्यामुळे १ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.