मुंबई
kailash kher आपल्या भारदस्त आवाजाने आणि वैशिष्ट्यपूर्ण गायकीने संगीतप्रेमींवर मोहिनी घालणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या आयुष्यातील एक थक्क करणारा प्रसंग सध्या चर्चेत आला आहे. आजवर आपल्या गाण्यांमधून चाहत्यांची मने जिंकणाऱ्या कैलाश खेर यांनी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी एका विषारी कोब्राला चक्क आपला सोबती बनवले होते. विशेष म्हणजे, हा साप तब्बल तीन महिने त्यांच्यासोबत राहिला. एवढेच नव्हे, तर थंडीच्या दिवसांत तो त्यांच्या गोधडीत झोपायचा, तर बाहेर जाताना कैलाश त्याला बॅगेतून सोबत घेऊन जायचे. स्वतः कैलाश यांनी एका पॉडकास्टमध्ये हा अनोखा अनुभव सांगितला आहे.

रणवीर अलाहाबादिया याच्या पॉडकास्टमध्ये संवाद साधताना कैलाश खेर यांनी आपल्या आयुष्यातील या विलक्षण प्रसंगाचा उलगडा केला. साधारण २० वर्षांचे असताना हा कोब्रा त्यांच्या संपर्कात आला आणि पुढील तीन महिने त्यांच्यासोबत राहिला. थंडीच्या दिवसांत ते त्याला स्वतःच्या गोधडीत घेऊन झोपत असत. कुठे बाहेर जायचे असल्यास त्याला बॅकपॅकमध्ये ठेवून सोबत घेऊन जात असत. एका विषारी सापासोबत इतक्या जवळीकतेने राहण्याचा त्यांचा हा अनुभव ऐकून पॉडकास्टमधील चर्चेनेही वेगळेच लक्ष वेधून घेतले.
या कोब्रासोबत त्यांचे एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. त्याला भूक लागली आणि बराच वेळ अन्न मिळाले नाही, तर तो फुत्कार मारायचा. त्यावरून आपल्याला भूक लागल्याचे तो जणू सांगत असल्याचे कैलाश यांच्या लक्षात आले होते. अशा वेळी कैलाश त्याला पकडून ‘खूप मस्ती करतोय’ असे म्हणत पुन्हा बॅगेत ठेवायचे. या आठवणी सांगताना त्यांनी त्या काळातील आपल्या आणि कोब्राच्या सहवासाचे चित्र उभे केले.
मात्र, काही काळानंतर कैलाश यांनी या सापाला मुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामागेही एक संवेदनशील विचार होता. कोब्राला खाऊ घालण्यासाठी उंदरांची व्यवस्था करावी लागत होती. एका जीवाचे रक्षण करण्यासाठी दुसऱ्या जीवाचा बळी घेणे योग्य नसल्याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे त्यांनी कोब्राला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्याचे ठरवले.
या अनुभवाबाबत बोलताना कैलाश यांनी आणखी एक महत्त्वाची बाब सांगितली. कोब्राचे दात काढलेले असले, तरी त्याच्या फुत्कारातून विष बाहेर पडण्याची शक्यता असते, असे त्यांनी नमूद केले. संतांचा सहवास, जंगल आणि डोंगरांमध्ये केलेली भटकंती यामुळे लहान-मोठ्या जीवांविषयी मनात भीती निर्माण झाली नव्हती. त्यामुळेच तरुण वयात आपण एका विषारी कोब्रासोबत इतक्या सहजपणे राहू शकलो, असे त्यांनी स्पष्ट केले.
कैलाश खेर यांच्या गायकीची जादू चाहत्यांनी अनेकदा अनुभवली आहे. मात्र, त्यांच्या आयुष्यातील हा अनोखा आणि थक्क करणारा प्रसंग समोर आल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पैलू चाहत्यांना जाणून घेता आला आहे.