मुंबई
adoptions राज्यातील अनाथ आणि निराधार बालकांना सुरक्षित व प्रेमळ कौटुंबिक वातावरण मिळावे, यासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे चित्र आहे. महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, २०२२-२३ पासून सप्टेंबर २०२६ पर्यंत महाराष्ट्रात एकूण २,३७६ दत्तक प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांतील दत्तक प्रक्रियेच्या कामगिरीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यात सध्या ६२ विशेष दत्तक संस्था (एसएए) कार्यरत आहेत. बालसंगोपन संस्थांशी (सीसीआय) प्रभावी समन्वय साधल्यामुळे २०० हून अधिक मुले कायदेशीररीत्या दत्तक जाण्यासाठी पात्र ठरली आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘प्रथम कुटुंब’ या धोरणाला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक मुलाला हक्काचे कुटुंब मिळण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
संगोपन पालकत्व अर्थात फॉस्टर केअरचा प्रायोगिक प्रकल्प २०२० मध्ये राज्यातील पाच जिल्ह्यांत सुरू करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत १५ मुलांना संगोपनासाठी पालक कुटुंबांकडे पाठवण्यात आले, तर १२९ मुले फॉस्टर केअरसाठी पात्र ठरली आहेत. यासोबतच विभागाने जनजागृतीसाठी ६६ कार्यक्रम आणि जिल्हास्तरावर ३२८ प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले. मंत्री कार्यालयातून धोरणात्मक समन्वय आणि योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी मंत्र्यांचे खासगी सचिव राजेश श्रीकृष्ण गायकवाड सांभाळत आहेत. विविध यंत्रणांच्या नियमित आढावा बैठका घेतल्यामुळे मुलांना कायमस्वरूपी कौटुंबिक आधार देण्याच्या प्रक्रियेला गती मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’अंतर्गत १ लाख ७२ हजार ६५६ मुलांना दरमहा प्रत्येकी २ हजार २५० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. त्यामुळे या मुलांचे संगोपन संस्थांऐवजी कुटुंबातच होण्यास मदत मिळते. तसेच ‘मिशन वात्सल्य’ योजनेअंतर्गत ३२ हजार ५२० मुलांना दरमहा प्रत्येकी ४ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.
बालसंगोपन संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या मुलांना पुढील आयुष्यात आधार मिळावा, यासाठी राज्यात सात अनुरक्षण गृहे कार्यरत आहेत. या गृहांची एकूण प्रवेश क्षमता ७०० असून, त्यासाठी दरवर्षी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी दिला जातो. याशिवाय, ‘मिशन वात्सल्य’ योजनेच्या माध्यमातून १ हजार २११ किशोरवयीन मुलांनाही मदत पुरवली जात आहे.सप्टेंबर २०२६ पर्यंत राज्यात १२ हजारांहून अधिक अनाथ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. एक टक्का आरक्षण धोरणांतर्गत या प्रमाणपत्रधारकांपैकी १ हजार ६० जणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत. तसेच, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात उच्च व तंत्रशिक्षणाच्या शुल्कासाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ ९९ अनाथ विद्यार्थ्यांना मिळाला आहे, अशी माहिती विभागाने दिली.यापुढील काळात संगोपन पालकांसाठी अधिक दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विभागाने मांडला आहे. बालसंगोपन संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या मुलांना सज्ञान झाल्यानंतर स्वतंत्र आयुष्य जगता यावे, यासाठी त्यांची किमान एक वर्ष आधीपासून तयारी करण्याचेही नियोजन आहे. या प्रक्रियेत शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार, निवास आणि आरोग्यसेवा यांसारख्या महत्त्वाच्या बाबींसाठी आवश्यक मदत देण्यावर भर दिला जाणार आहे.