रुग्णालयांची मनमानी रोखण्यासाठी राज्यात नवा कायदा

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
मुंबई
maharashtra medical establishments act
खासगी रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबविणे, वैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता आणणे आणि रुग्णांना कायदेशीर हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार ‘महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना कायदा’ आणणार आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना पैशांची मागणी न करता तातडीने प्राथमिक उपचार देणे बंधनकारक असेल. तसेच नोंदणीशिवाय कोणताही दवाखाना किंवा रुग्णालय सुरू करता येणार नाही. विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडून संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिली.



वैद्यकीय तंत्रज्ञान, उपचारपद्धती आणि रुग्णांच्या हक्कांविषयी वाढलेल्या अपेक्षा लक्षात घेऊन हा कायदा तयार करण्यात आला आहे. खासगी आरोग्यसेवा क्षेत्रात पारदर्शकता निर्माण करणे, रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला आळा घालणे आणि सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये आरोग्यसेवेचा किमान दर्जा राखणे, हे या कायद्याचे प्रमुख उद्देश आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही रुग्णाला उपचार नाकारले जाऊ नयेत, यासाठीही कठोर तरतुदी प्रस्तावित आहेत.

आरोग्यमंत्री आबीटकर यांनी पावसाळी अधिवेशनात हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडले होते. मात्र, त्यातील काही तरतुदींवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकले नाही. महायुतीतील घटक पक्षांमध्येही काही मुद्द्यांवर मतभिन्नता निर्माण झाली. त्यामुळे विधेयक दोन्ही सभागृहांच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्यात आले. आबीटकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने विधेयकातील तरतुदींवर राज्यातील नागरिक, सामाजिक संस्था, संघटना आणि स्वयंसेवी संस्थांकडून सूचना व सुधारणा मागविल्या. राज्यातील विविध ठिकाणी बैठका घेऊन संबंधितांशी चर्चा करण्यात आली तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हा कायदा विशेषतः गरीब आणि गरजू रुग्णांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. संयुक्त समितीने विविध बैठकांमधून नागरिक, संस्था आणि संघटनांची मते जाणून घेतली असून, त्यांच्या सूचनांचा विचार केला आहे. हिवाळी अधिवेशनात समितीचा अहवाल आणि विधेयक सादर केले जाईल. हे विधेयक संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी स्पष्ट केले.


प्रस्तावित कायद्याच्या कक्षेत अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध, योग आणि निसर्गोपचार अशा विविध वैद्यकीय पद्धतींशी संबंधित संस्था आणण्यात येणार आहेत. खासगी, धर्मादाय आणि स्वायत्त संस्थांची रुग्णालये, नर्सिंग होम, दवाखाने, डे-केअर केंद्रे, निदान केंद्रे, पॅथॉलॉजी लॅब तसेच वैद्यकीय प्रयोगशाळांनाही हा कायदा लागू असेल. मात्र, लष्कराची रुग्णालये, मनोरुग्णालये तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांना या कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे.

रुग्णालयांमध्ये उपचारांच्या शुल्काबाबत पारदर्शकता राहावी, यासाठी प्रत्येक रुग्णालयाच्या दर्शनी भागात उपचार, वैद्यकीय चाचण्या आणि विविध सेवांचे दरपत्रक लावणे बंधनकारक असेल. हे दरपत्रक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये असावे, तसेच रुग्णालयाच्या संकेतस्थळावरही ते प्रसिद्ध करावे लागेल. निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारणे किंवा रुग्णाला उपचारांचे सविस्तर बिल न देणे, अशा प्रकारांवर कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.


रुग्णांना त्यांच्या आजाराचे निदान, उपचारांची पद्धत आणि त्यासाठी येणाऱ्या संभाव्य खर्चाची माहिती मिळण्याचा कायदेशीर अधिकारही या कायद्याद्वारे दिला जाणार आहे. त्याचबरोबर केस पेपर, उपचारांचा तपशील आणि दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मत घेण्याचा अधिकार रुग्णांना असेल. त्यामुळे उपचारांबाबत माहिती मिळविणे आणि योग्य निर्णय घेणे रुग्णांना अधिक सुलभ होणार आहे.

वैद्यकीय संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र नोंदणी प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र नोंदणी यंत्रणा असेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांची नोंदणी रद्द करणे, नोंदणी निलंबित करणे तसेच आर्थिक दंड आकारण्याचे अधिकार या प्राधिकरणाला देण्यात येणार आहेत. नोंदणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही दवाखान्याला किंवा रुग्णालयाला कामकाज सुरू करता येणार नाही. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये मोफत उपचार देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील संपूर्ण आरोग्यव्यवस्थेचे नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी राज्य चिकित्सा आस्थापना परिषदेची स्थापना करण्याची तरतूदही विधेयकात करण्यात आली आहे.