फटाक्यांच्या’ आवाजाने नागरिकांचे जगणे नकोसे; दोन बुलेटस्वारांवर गुन्हे!

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
Bullet Riders
रस्त्यावरून धावणारी बुलेट आणि तिच्या सायलेन्सरमधून निघणारा फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज… काही वाहनचालकांसाठी ही हौस असली, तरी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि सर्वसामान्यांसाठी तो त्रासदायक ठरत आहे. अशा बुलेटस्वारांविरुद्ध नागपूर वाहतूक पोलिसांनी आता कठोर पवित्रा घेतला आहे. मॉडिफाईड सायलेन्सर लावून फटाक्यांचा आवाज करणाऱ्या दोन बुलेटचालकांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येणार आहे.


पोलिस उपायुक्त (वाहतूक) आदित्य मिरखेलकर यांनी या प्रकारांची गंभीर दखल घेत संबंधित चालकांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शहरात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. केवळ दंड आकारून अशा प्रकारांना आळा बसत नसल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यावर भर दिला जात आहे. सदर वाहतूक पोलिस शाखेत कार्यरत पोलिस उपनिरीक्षक सुनील जाधव आणि त्यांचे सहकारी फुटाळा परिसरात तैनात असताना, व्हीसीए चौकाकडून फुटाळा चौकाच्या दिशेने जाणाऱ्या एमएच ३१ ईएक्स ५५११ क्रमांकाच्या बुलेटमधून फटाक्यांसारखा आवाज येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. पीएसआय सुनील जाधव यांनी तत्काळ बुलेटचा पाठलाग करून चालकाला थांबविले. तपासणीदरम्यान वाहनाला मॉडिफाईड सायलेन्सर लावल्याचे आढळले. त्यानंतर वरिष्ठांना माहिती देऊन नदीम अहमद कुरेशी (रा. गड्डीगोदाम) याच्याविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली.


सीसीटीव्ही फुटेजवरून दुसऱ्या बुलेटवर कारवाई

दुसऱ्या प्रकरणात मो. रफिक अन्सारी (रा. अन्सारनगर, मोमीनपुरा) याच्या एमएच ४० बीएम ००२४ क्रमांकाच्या बुलेटला मॉडिफाईड सायलेन्सर लावून फटाक्यांसारखा आवाज केला जात असल्याचे समोर आले. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर वाहनमालकाला तोंडी सूचना देऊन बुलेट घरातून जप्त करण्यात आली. अन्सारी याच्याविरुद्धही सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हौसेपायी परवाना गमावण्याची वेळ

बुलेटचा मूळ आवाज बदलून फटाक्यांसारखा आवाज काढणे ही केवळ हौस नसून, त्यामुळे इतर नागरिकांना त्रास होऊ शकतो आणि ध्वनिप्रदूषणात भर पडते. त्यामुळे मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यासोबतच वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यासाठीही संबंधित प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. कारवाई, दंड आणि परवाना गमावण्याची वेळ टाळायची असेल, तर वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांनी केले आहे.