तीन तेल कंपन्या आगीच्या विळख्यात, कोट्यवधींच्या नुकसानीची भीती

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
नवी मुंबई
navi mumbai fire
नवी मुंबईतील वाशी येथील सेक्टर १८ मधील माफको मार्केट परिसरात रविवारी मध्यरात्री एका तेल कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण करत शेजारील प्लायवूड युनिट आणि एका कुरिअर कंपनीलाही आपल्या विळख्यात घेतले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. पहाटे दोन वाजेपर्यंत आगीच्या उंचच उंच ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले होते. रविवारची सुटी असल्याने संबंधित कंपन्यांमध्ये कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.



प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास तेल कंपनीच्या गोदामात अचानक आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणावर तेल आणि अन्य ज्वलनशील पदार्थांचा साठा असल्याने आगीने वेगाने पेट घेतला. काही वेळातच तिची तीव्रता वाढली आणि आगीचे लोण आसपासच्या औद्योगिक आस्थापनांपर्यंत पोहोचले.

या आगीत शेजारील प्लायवूड युनिट आणि कुरिअर कंपनीलाही मोठा फटका बसला. प्लायवूड, लाकूड तसेच पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यामुळे आग अधिक भडकली आणि ती आटोक्यात आणण्याचे काम अग्निशमन दलासाठी आव्हानात्मक ठरले. दरम्यान, आगीच्या वेळी परिसरात स्फोटासारखे मोठे आवाज ऐकू आल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आगीची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. आग अन्य औद्योगिक युनिट्सपर्यंत पसरू नये, यासाठी अग्निशमन जवानांनी सर्व बाजूंनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या दुर्घटनेत तिन्ही कंपन्यांमध्ये साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील माल जळून खाक झाल्याची शक्यता आहे. नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नसला, तरी लाखो ते कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असावे, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस संयुक्तपणे या घटनेचा तपास करत आहेत.