ISIS प्रकरणातील मोहम्मद शोएब खानला फरार घोषित

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
मुंबई
nia case
इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी मोहम्मद शोएब खान याला विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे. दहशतवादी संघटनेसाठी तरुणांची भरती करणे आणि देशातील संवेदनशील ठिकाणांवर हल्ले घडवून आणण्याचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करीत असून, शोएब सध्या लिबियात लपून बसल्याचा संशय आहे. वारंवार समन्स बजावूनही तो न्यायालयात हजर न राहिल्याने आणि कायदेशीर कारवाई टाळल्याने न्यायालयाने त्याला फरार घोषित करण्याचा निर्णय घेतला.



विशेष न्यायाधीश डॉ. अभय ए. जोगळेकर यांनी हा आदेश दिला. पुरेशा सार्वजनिक सूचना देऊन तसेच कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनही आरोपी जाणीवपूर्वक फरार असून कायद्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाच्या आदेशांकडे त्याने केलेले दुर्लक्ष यातून स्पष्ट होत असल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले. या निर्णयामुळे आता तपास यंत्रणेला शोएबची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात शोएब खान आणि त्याचा साथीदार मोहम्मद झोहेब खान हे दोघेही एनआयएच्या रडारवर आहेत. दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीचा प्रसार करून तरुणांना आमिष दाखवत संघटनेत भरती करण्याचा आणि देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले घडवण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, शोएबने छत्रपती संभाजीनगर आणि परिसरातील तरुणांना आयएसआयएसमध्ये सामील करण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी दोघांनी मिळून व्हॉट्सॲप ग्रुपही तयार केला होता. एनआयएने झोहेबला अटक केली; मात्र शोएब देशाबाहेर पळून जाण्यात यशस्वी झाला.

एनआयएने जुलै २०२४ मध्ये दोन्ही आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. तपास यंत्रणेच्या आरोपानुसार, लिबियात असलेला शोएब आयएसआयएसचा भारतविरोधी अजेंडा पुढे नेण्याच्या कटात सक्रियपणे सहभागी होता. दोन्ही आरोपींनी आयएसआयएसच्या स्वयंघोषित खलिफाप्रती ‘बैत’ म्हणजेच निष्ठेची शपथ घेतल्याचेही तपासात समोर आल्याचे एनआयएने म्हटले आहे. ते राष्ट्रविरोधी कारवायांच्या मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याचा एजन्सीचा आरोप आहे.

भारतात दहशतवादी हल्ल्यांची मालिका घडवून आणल्यानंतर अफगाणिस्तान किंवा तुर्की येथे पळून जाण्याची योजना दोघांनी आखली होती, असा दावा एनआयएने केला आहे. आयएसआयएसची कट्टर आणि हिंसक विचारसरणी पसरवण्यासाठी तसेच जगभरातील तरुणांना संघटनेशी जोडण्यासाठी वेबसाइट तयार करण्याच्या प्रयत्नांतही त्यांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाल्याचे सांगण्यात आले. परदेशी सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून त्यांचे आंतरराष्ट्रीय संपर्क असल्याचेही तपास यंत्रणेच्या निदर्शनास आले.

एनआयएच्या माहितीनुसार, झोहेबने छत्रपती संभाजीनगर परिसरातील ५० हून अधिक तरुणांना कट्टरपंथी बनवून आयएसआयएसमध्ये भरती करण्याच्या उद्देशाने एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले होते. या ग्रुपमध्ये स्फोटके आणि आयईडी तयार करण्यासंबंधीचे व्हिडिओही शेअर केले जात होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असून, शोएबला फरार घोषित केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईचा मार्ग खुला झाला आहे.