मुंबई
nsel scam नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (एनएसईएल) घोटाळ्यातील पाच हजारांहून अधिक गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने जप्त केलेल्या आणि नंतर विक्री केलेल्या मालमत्तांमधून जमा झालेल्या निधीपैकी एकरकमी समझोता योजनेअंतर्गत (ओटीएस) १,९५० कोटी रुपयांचे वितरण पीडित गुंतवणूकदारांना करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस. सी. गुप्ते आणि राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) नियुक्त केलेल्या देखरेख प्राधिकरणाच्या उपस्थितीत सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी ही रक्कम वितरित केली जाणार आहे.

एनएसईएलने २००८ मध्ये ऑनलाइन कमोडिटी एक्सचेंज प्लॅटफॉर्म सुरू केले होते. या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांनी दलालांमार्फत कृषी वस्तूंच्या व्यापारात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, या व्यवहारांमधून मोठ्या प्रमाणावर निधी काढून घेतला गेल्याचा आरोप करण्यात आला आणि पुढे हा घोटाळा उघडकीस आला.
या प्रकरणात कथित फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणुकीसाठी प्रवृत्त करणे आणि गुन्हेगारी कट रचणे अशा आरोपांखाली भारतीय दंड संहितेनुसार आतापर्यंत २२० आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ८५ कंपन्या, दलाल आणि थकबाकीदारांचाही समावेश आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम तसेच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) कायद्यातील तरतुदींचाही वापर केला आहे.
मुंबई शहराचे उपजिल्हाधिकारी आणि या प्रकरणातील सक्षम प्राधिकारी अनिल करांडे यांनी राज्य सरकारकडून जप्त व विक्री करण्यात आलेल्या मालमत्तांमधून प्राप्त झालेला निधी गुंतवणूकदारांना हस्तांतरित केला जाणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पीडित गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते. एकरकमी समझोता योजना (ओटीएस) मुळात एनएसईएल इन्व्हेस्टर्स फोरमने (एनआयएफ) मांडली होती. मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेच्या प्रस्तावाला नंतर एनएसईएलने आपल्या मूळ कंपनी ६३ मून्स टेक्नॉलॉजीजच्या पाठिंब्याने मंजुरी दिली. त्यानंतर ५,६८२ व्यापाऱ्यांसोबत एकरकमी समझोत्याद्वारे पूर्ण आणि अंतिम तोडगा काढण्यासाठी एनसीएलटीसमोर तडजोडीची योजना सादर करण्यात आली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.