इंग्लंड मालिकेसाठी पाकिस्तानचा युवा संघ जाहीर

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
रावळपिंडी,
england-series भारताकडून १९ वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात एका विकेटने पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचा युवा संघ आता नव्या आव्हानासाठी मैदानात उतरणार आहे. इंग्लंडविरुद्ध मायदेशात होणाऱ्या आगामी मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने १९ वर्षांखालील संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत फरहान युसूफ याच्याकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामने आणि एक चार दिवसीय सामना खेळवला जाणार आहे.

england-series
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन्ही प्रकारच्या सामन्यांसाठी प्रत्येकी १५ खेळाडूंची निवड केली आहे. दोन्ही संघांचे नेतृत्व फरहान युसूफ करणार आहे. इंग्लंडचा युवा संघ १ डिसेंबर रोजी इस्लामाबादमध्ये दाखल होईल. त्यानंतर २ ते ४ डिसेंबर या कालावधीत रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर सराव सत्र आयोजित करण्यात आले आहे.
या मालिकेला ५ डिसेंबरपासून सुरुवात होईल. पहिला एकदिवसीय सामना ५ डिसेंबरला, दुसरा सामना ७ डिसेंबरला, तर तिसरा सामना ९ डिसेंबरला खेळवला जाणार आहे. या तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येकी ४५ षटके असतील. त्यानंतर १३ ते १६ डिसेंबरदरम्यान दोन्ही संघांमध्ये चार दिवसीय सामना रंगणार आहे. मालिकेतील सर्व सामने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवरच आयोजित करण्यात आले आहेत.
आशिया कपमधील पराभव विसरून पुनरागमनाचे लक्ष्य
पाकिस्तानच्या युवा संघाला नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ओमानमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा एका विकेटने पराभव केला होता. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विजय मिळवून पुन्हा आत्मविश्वास मिळवण्याचा पाकिस्तानी संघाचा प्रयत्न असेल.
विशेष म्हणजे, याच वर्षी पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाने इंग्लंडचा दौरा केला होता. त्या मालिकेत दोन्ही संघांमध्ये चार एकदिवसीय आणि एक चार दिवसीय सामना खेळवण्यात आला होता. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका ३-१ अशी जिंकली होती. मात्र, चार दिवसीय सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला अवघ्या १० धावांनी पराभूत केले होते. आगामी मालिकेच्या तयारीसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंचे २४ ते ३० नोव्हेंबरदरम्यान लाहोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण शिबिर होणार आहे. त्यानंतर १ डिसेंबरला संघ रावळपिंडीकडे रवाना होईल.
एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ
फरहान युसूफ (कर्णधार), अब्दुल कादिर, अब्दुल सुभान, हम्माद आसिफ, हम्माद अझीझ, हमजा झहूर, हयाम खान, हसनेन अब्बास दार, हुझियाफा अहसान, इब्तिसाम अझहर, मोहम्मद सय्यम, नकाब शफीक, रिझवानुल्ला, उस्मान खान आणि झीशान अहमद.
चार दिवसीय सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ
फरहान युसूफ (कर्णधार), अब्दुल कादिर, असद उमर, हम्माद आसिफ, हम्माद अझीझ, हमजा जहूर, हसन खान, हायम खान, हसनैन अब्बास दार, इब्तिसाम अझहर, मोहम्मद सय्यम, मोहम्मद सोहेब, रिझवानुल्लाह, उस्मान खान आणि झीहान अहमद.