वाशीम,
pcpndt-team-conducts-swift वाशीम येथील एजंटच्या सहभागातून सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान प्रकरणाचा वाशीम, बुलढाणा आणि अकोला या तीन जिल्ह्याच्या पीसीपीएनडीटी संयुक्त पथकाने बुलढाणा जिल्ह्यात केलेल्या कारवाईत पर्दाफाश केला. अमडापूर-लवाळा रोडवरील एका शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे अवैध सोनोग्राफी सुरू असताना बोगस डॉटर, वाशीम येथील एजंट आणि त्यांना मदत करणार्या अन्य एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून सोनोग्राफी मशीनसह तपासणीचे साहित्य जप्त करण्यात आले असून, तिन्ही आरोपींविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बोगस डॉटर वाशीम येथील एजंटच्या माध्यमातून विविध ठिकाणी जाऊन पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने अवैध गर्भलिंग निदान करत असल्याची माहिती पीसीपीएनडीटी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डिकॉय केस तयार करून कारवाईचे नियोजन करण्यात आले. अकोला मंडळाच्या उपसंचालक डॉ. आरती कुलवाल, वाशीमचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे आणि बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन जिल्ह्यांच्या पथकाने संयुक्त मोहीम राबविली. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून पथक संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. पाठलागादरम्यान संशयित अमडापूर-लवाळा रोडवरील गणेश शंकरराव सूर्यवंशी यांच्या शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोहोचले. तेथे डिकॉय केसच्या माध्यमातून सोनोग्राफी तपासणी सुरू होताच वाशीम, बुलढाणा आणि अकोला येथील संयुक्त पथकाने कारवाई केली. दुपारी २ वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत तिघांना ताब्यात घेऊन सोनोग्राफी मशीन व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी चिखली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमर सय्यद यांनी सायंकाळी ६ वाजता अमडापूर पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या संयुक्त कारवाईत वाशीम पीसीपीएनडीटी विभागाच्या विधी समुपदेशक अॅड. राधा नरवलिया, डॉ. उमर सय्यद, डॉ. अनुप चौधरी, डॉ. सोनाली तायडे, विधी समुपदेशक अॅड. शुभांगी ठाकरे, अकोला विभागीय पथकातील स्टाफ नर्स किरण जाणूनकर, डॉ. राहुल डोंगरे, बुलढाणा जिल्हा रुग्णालयाच्या विधी समुपदेशक अॅड. वंदना काकडे, चिखली उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. उमेश सावजी आणि बुलढाणा पीसीपीएनडीटी विभागाचे ज्ञानेश्वर मुळे यांनी सहभाग घेतला.
वाशीम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी पीसी संतोष वाघ, एलपीसी तेजस्विनी खोडके, डीपीसी सुनील तायडे तसेच अमडापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांनी या कारवाईत सहकार्य केले. गर्भलिंग निदान करणे, गर्भलिंग सांगणे अथवा त्यासाठी मदत करणे हा पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि मुलगा-मुलगी समानतेचा संदेश समाजात रुजवण्यासाठी अशा अवैध प्रकारांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवून कारवाई करण्यात येत आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.