छत्रपती संभाजीनगर
samruddhi expressway accident समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, हर्सूल सावंगी परिसरात पुन्हा एकदा भीषण दुर्घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री मुंबई कॉरिडॉरवरील चॅनेल क्रमांक ४२६ येथे यवतमाळहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाला. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर १५ ते १६ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बस महामार्गावरून जात असताना चालकाला अचानक चक्कर आली. त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेल्या बसने रस्त्यावरील सिमेंटच्या पुलाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर बस पलटी झाली आणि त्यातील प्रवासी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना मदत करण्यासह पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, अपघातातील जखमींची संख्या आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.