तभा वृत्तसेवा
उमरखेड,
nitin bhutada तालुक्यातील खरुस खुर्द आणि खरुस बुद्रुक या दोन गावांच्या नावांमधील साधर्म्यामुळे महसूल व प्रशासकीय नोंदींमध्ये मोठा गोंधळ झाला होता. एका गावातील नागरिकांची नावे दुसऱ्या गावात, तर दुसऱ्या गावातील नागरिकांची नावे पहिल्या गावात नोंदवली गेल्याने या दोन्ही गावकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
विशेषतः पीक विमा, सानुग्रह अनुदान तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळविताना या चुकीच्या नोंदींचा मोठा फटका शेतकèयांना बसत होता. कागदपत्रांची पूर्तता करूनही केवळ प्रशासकीय नोंदीतील त्रुटींमुळे शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
ही बाब जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा महाराजस्व अभियानचे राज्य सदस्य भाजपा नेते नितीन भुतडा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पुढाकार घेतला. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सचिव नीलेश शींगी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. यानंतर प्रशासकीय स्तरावर तातडीने हालचाली झाल्या. संबंधित यंत्रणांकडून प्रकरणाची दखल घेत आवश्यक कार्यवाही करण्यात आली आणि 12 तासांत दोन्ही गावांमधील नावांच्या नोंदींमुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यात आला. nitin bhutadaया कार्यवाहीचा थेट लाभ दोन्ही गावांतील 1,500 हून अधिक शेतकऱ्यांना झाला असून, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी 5 हजार रुपये सानुग्रह अनुदानाची रक्कम तत्काळ जमा झाली आहे. अनेक दिवसांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने दोन्ही गावांतील शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे, शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, त्यांच्या अडचणींचे वेळेत निराकरण व्हावे आणि प्रशासकीय त्रुटींमुळे कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी नितीन भुतडा यांनी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला आहे.
दिलासा मिळाला
प्रश्न शेतकऱ्यांचा असो किंवा सर्वसामान्य नागरिकांचा, योग्य ठिकाणी पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देणे हेच लोकप्रतिनिधी आणि सामाजिक जबाबदारी स्वीकारलेल्या व्यक्तीचे खरे कर्तव्य आहे. खरुस खुर्द आणि खरुस बुद्रुक येथील शेतकèयांना मिळालेला हा दिलासा त्याचेच उदाहरण ठरले आहे.
ज्ञानेश्वर वानखडे
शेतकरी, खरूस खुर्द