मानोरा बसस्थानकावर महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

सात संशयित महिला विठोलीतून ताब्यात

    दिनांक :23-Nov-2026
Total Views |
मानोरा,
manora-bus-stand बसप्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधील सोन्या-चांदीचे सुमारे २ लाख ७८ हजार रुपयांचे दागिने चोरी झाल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी मानोरा पोलिसांनी तातडीने कारवाई करीत विठोली येथून सात संशयित महिलांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर असे की, सुरेखा हनुमान इंगोले (वय ४५, रा. मोहगव्हाण, पारवा) या २३ नोव्हेंबर रोजी सकाळी बोरी येथे माहेरी जाण्यासाठी भोयणी फाटा येथून मानोरा जाणार्‍या बसमध्ये बसल्या होत्या.
 
 
 
यावेळी त्यांच्या आजूबाजूच्या आसनांवर लहान मुलांसह सहा ते सात अनोळखी महिला बसल्या होत्या. सकाळी सुमारे १०.४५ वाजता मानोरा बसस्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी मोठ्या पर्समधील लहान पर्स तपासली असता सोन्याचे दागिने असलेली पर्स गायब असल्याचे निदर्शनास आले.चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याची अंगठी, कानातील टापसे, शिपला, सोन्याची पोत, बाळ्या तसेच चांदीचे जोडवे असा एकूण २१.५० ग्रॅम सोन्याचा व २० ग्रॅम चांदीचा ऐवज होता. सोन्याच्या दागिन्यांची किंमत अंदाजे २ लाख ७५ हजार रुपये, तर चांदीच्या दागिन्यांची किंमत ३ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी सुरेखा इंगोले यांच्या फिर्यादीवरून सात अनोळखी महिलाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान चोरीतील संशयित महिला ऑटोने विठोलीच्या दिशेने गेल्याची गोपनीय माहिती ठाणेदार नैना पोहेकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने पोलिस पथकासह विठोली येथे धाव घेत सात महिलांना ताब्यात घेतले.ही कारवाई ठाणेदार नैना पोहेकर, जमादार शेषराव राठोड, पोलीस शिपाई रोहन तायडे, फिरोज शेख, चेतन भोयर व महिला पोलीस सुषमा लोखंडे यांनी केली. पुढील तपास मानोरा पोलिस करीत आहेत.