नवी दिल्ली,
pahalgam attack पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चीनच्या उपग्रहांच्या संशयास्पद हालचालींची माहिती समोर आली आहे. बेंगळुरूस्थित अंतराळ निरीक्षण क्षेत्रातील खासगी कंपनी दिगंताराच्या विश्लेषणानुसार, हल्ल्यापूर्वी चीनच्या उपग्रहांनी आपल्या कक्षांमध्ये असामान्य बदल केले होते. १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत चीनच्या एकूण १,३३२ अंतराळ वस्तूंच्या हालचालींचा अभ्यास करण्यात आला. यापैकी १९० वस्तूंनी किमान एकदा कक्षा बदलली, तर ३७ हालचाली असामान्य स्वरूपाच्या असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. या बदलांमुळे जम्मू-काश्मीरमधील पहलगाम आणि आसपासच्या संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्याच्या संधी वाढल्याचे विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालातील महत्त्वाची बाब म्हणजे, १६ एप्रिल २०२५ रोजी चीनच्या Yaogan-35-01A या उपग्रहाने कक्षेत बदल केला होता. पहलगाम हल्ल्याच्या सहा दिवस आधी झालेल्या या बदलामुळे संबंधित भागावरून उपग्रहाच्या जाण्याचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले. याशिवाय, २२ एप्रिल रोजी हल्ला झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजून १४ मिनिटांनी Yaogan-39-01B आणि ५ वाजून ५९ मिनिटांनी Yaogan-39-01C या दोन उपग्रहांनीही कक्षा बदलल्याची माहिती अहवालात आहे. या हालचालींमुळे पहलगामसह श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि जम्मू परिसराच्या निरीक्षणाची शक्यता वाढली होती. दरम्यान, ७ मे २०२५ रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर १० आणि ११ मे रोजी Ningxia-14, Gaofen-11 आणि Yaogan-30 या चीनच्या तीन उपग्रहांचे लक्ष गुजरातच्या किनारपट्टीवरील भुज, नलिया आणि जामनगर परिसराकडे असल्याचे दिगंताराच्या दुसऱ्या विश्लेषणातून समोर आले. या भागात महत्त्वाची औद्योगिक, लष्करी आणि नौदलाशी संबंधित ठिकाणे आहेत.
चीन आणि पाकिस्तानमधील वाढते अंतराळ सहकार्यही भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. द प्रिंटच्या २४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या वृत्तानुसार, जानेवारी २०२५ ते जून २०२६ या कालावधीत पाकिस्तानने सहा उपग्रह प्रक्षेपित केले. त्यापैकी पाच उपग्रहांच्या प्रक्षेपणात किंवा तांत्रिक सहकार्यात चीनची भूमिका होती. त्यामुळे पाकिस्तानची अंतराळ निरीक्षण आणि संपर्क यंत्रणा अधिक सक्षम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.pahalgam attack भारताकडे कार्टोसॅट, रिसॅट आणि एमिसॅट यांसारखे उपग्रह असून, त्यांच्या माध्यमातून पृथ्वीवरील घडामोडी, रडार निरीक्षण आणि इलेक्ट्रॉनिक माहितीचे संकलन केले जाते. मात्र, अन्य देशांच्या उपग्रहांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि संभाव्य धोक्यांचे वेळीच आकलन करणे हे भारतासमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. विशेष म्हणजे, चीनच्या उपग्रहांच्या हालचाली आणि पहलगाम हल्ला यांच्यात थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे या हालचालींना चीनचा हल्ल्यातील सहभाग असल्याचा पुरावा मानता येणार नसला, तरी भविष्यातील सुरक्षेच्या दृष्टीने अंतराळ क्षेत्रातील निरीक्षण क्षमता बळकट करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.