‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याला न्यायालयात हजर करा

चार्जशीटमधून साक्षीदारांचे बयाण गहाळ केल्याचा आरोप

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
witness statements omitted एका महिलेच्या आत्महत्या प्रकरणात महत्त्वाच्या साक्षीदारांचे बयाण तसेच मृत महिलेचा मोबाइल फोन चार्जशीटमधून गहाळ केला. ही बाब लक्षात येताच महिलेचे नातेवाईक हेमराज गजभिये यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने तपास अधिकारी निवृत्ती गीते यांना नोटीस बजावली असून त्यांना २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फालके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्यासमक्ष याचिकेवर सुनावणी झाली.

witness statements omitted 
 
 
याचिकाकर्त्याच्या माहितीनुसार, २०२३ मध्ये त्यांच्या मुलीने तुमसर येथे सासरी संशयास्पद परिस्थितीत आत्महत्या केली होती. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत पती आणि सासू मृत्यूस जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी पती सतीश बेलेकर आणि सासू रत्नमाला बेलेकर यांना अटक करण्यात आली होती व दोघांनाही नंतर भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.
पती सतीशला जामीन मंजूर करताना न्यायालयाने साक्षीदारांच्या बयाणांची नोंद घेतली होती. मात्र, आरोपींना वाचवण्यासाठी तपास अधिकाऱ्याने साक्षीदारांचे बयाण रेकॉर्डवरून गहाळ केले आणि चार्जशीटमध्येही त्यांचा समावेश किंवा उल्लेख केला नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. आरोपी आणि तपास अधिकाऱ्यांनी संगनमत करून हे कृत्य केल्याचा दावाही याचिकाकत्यार्ने केला आहे. याशिवाय, मुलीचा जप्त केलेला मोबाइल फोनही तपास अधिकाऱ्याने गहाळ केल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्या मोबाइलमध्ये आरोपींविरुद्ध महत्त्वाचे पुरावे आणि रेकॉर्डिंग असल्याचे सांगण्यात आले आहे.
मागणी आणि न्यायालयाची भूमिका
तपास अधिकाऱ्यावर कारवाई करावी, गहाळ पुराव्यांबाबत पोलिसांनी पुढील चौकशी करावी आणि तपास अधिकारी गीते व आरोपींमधील कथित संगनमताची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.witness statements omitted युक्तिवाद ऐकल्यानंतर तपास अधिकाऱ्यांकडून हे पुरावे चुकून सुटू शकतात का, याबाबत न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत तपास अधिकारी निवृत्ती गीते यांना नोटीस बजावून प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. हर्षिणी जामगडे आणि अ‍ॅड. अभियान बाराहाते यांनी बाजू मांडली.