भर व्हिडिओतून मागितली ईशा सिंगची माफी, म्हणाला, 'चूक माझीच

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
मुंबई
avinash mishra
अभिनेता अविनाश मिश्रा गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ईशा सिंगसोबतच्या नात्यातील तणावामुळे चर्चेत आहे. दोघांनीही यापूर्वी अनेकदा आपल्या प्रेमसंबंधांची जाहीर कबुली दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी ईशाने अविनाशला सोशल मीडियावर अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना सुरुवात झाली. आता या संपूर्ण प्रकरणावर अविनाशने स्वतः पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली आहे. आपल्या आणि ईशाच्या नात्यात आलेल्या दुराव्यासाठी स्वतःलाही जबाबदार धरत त्याने आपली चूक मान्य केली आहे.



या वादाला अधिक हवा मिळाली ती अविनाशच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे. ब्रेकअपनंतर एका क्लबमध्ये पार्टी करत असताना अविनाश डीजेच्या ठिकाणी गेला आणि त्याने 'बेवफा तू निकली' हे गाणे लावले. त्यावेळी वैयक्तिक आयुष्यात एखादी व्यक्ती व्यस्त असते, तेव्हा असे गाणे योग्य ठरते, अशा आशयाची टिप्पणीही त्याने केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला. या प्रकारामुळे ईशाला त्रास झाल्याची चर्चा रंगली.

यानंतर ईशानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली होती. तिने स्पष्टीकरण देतानाच अप्रत्यक्षपणे अविनाशला इशाराही दिला होता. ईशाचा भाऊ आणि दत्तक भाऊ रजत दलाल यानेही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत अविनाशविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे खासगी नात्यातील वाद सोशल मीडियावर अधिकच चिघळला. नेटकऱ्यांनीही अविनाशला लक्ष्य करत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

वाढता वाद आणि टीका लक्षात घेऊन अखेर अविनाशने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सविस्तर व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत त्याने संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत ईशाची माफी मागितली. डीजेवर गाणे वाजवल्याच्या घटनेचा वेगवेगळा अर्थ लावला जात असून, त्यात अनेक गोष्टींची भर घातली जात असल्याचे त्याने सांगितले. या प्रकाराचा सर्वाधिक त्रास ईशाला आणि तिच्या कुटुंबीयांना होत असल्याची जाणीवही त्याने व्यक्त केली. आपला कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असे सांगतानाच घडलेल्या प्रकाराबद्दल त्याने दिलगिरी व्यक्त केली.

अविनाशने आपल्या व्हिडिओमध्ये ईशासोबतच्या विभक्त होण्याच्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारली. "मी ईशासाठी जबाबदार आहे आणि आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. यामध्ये माझीही चूक आहे. मी दोषी आहे. माझ्याकडून चूक झाली असून, मी केवळ माफी मागण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे," अशा शब्दांत त्याने आपली भावना व्यक्त केली.

यासोबतच या वादात दोघांच्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना ओढू नये, असे आवाहनही त्याने नेटकऱ्यांना केले. हा दोन व्यक्तींमधील वैयक्तिक प्रश्न असून, त्यासाठी कुटुंबीयांना धमक्या देणे किंवा मित्रांना लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे त्याने स्पष्ट केले. संबंधित व्यक्तींना धमकीचे संदेश पाठवू नयेत आणि हे प्रकरण आणखी वाढवू नये, अशी विनंती त्याने केली.

"मला आता स्वतःवर काम करण्याची आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. स्वतःला सावरणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी पूर्णपणे बरा झाल्यानंतरच पुन्हा तुमच्यासमोर येईन. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि हे प्रकरण इथेच थांबवूया," असेही अविनाशने व्हिडिओत म्हटले आहे.

अविनाशने जाहीरपणे माफी मागत आपली चूक स्वीकारल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, ईशा सिंग यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.