पत्नी कर्करोगाने ग्रस्त,कर्जाचा डोंगर शेतकऱ्याची आत्महत्या

    दिनांक :24-Nov-2026
Total Views |
बीड
beed farmer suicide
बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या संकटाने आधीच शेतकरी हवालदिल झाले असताना शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. वडवणी तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे कर्जबाजारीपणा आणि खासगी सावकारांकडून होणाऱ्या कथित त्रासाला कंटाळून सुदाम कारभारी पडघन या शेतकऱ्याने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या पत्नीला कर्करोग असल्याने कुटुंबावर आधीच मोठे संकट ओढवले होते. त्यात वाढत्या कर्जाचा बोजा आणि सावकारांचा तगादा यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते.




सुदाम पडघन हे खंडोबाचीवाडी येथील सामान्य शेतकरी होते. शेतीच्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना त्यांच्यावरील कर्जाचा भार वाढत गेला. त्यातच पत्नी कर्करोगाने ग्रस्त असल्याने उपचारांचा आणि घरखर्चाचा ताणही कुटुंबावर होता. नातेवाइकांनी केलेल्या आरोपानुसार, खासगी सावकारांकडून पैशांसाठी त्यांना त्रास दिला जात होता. या सर्व परिस्थितीमुळे ते मानसिक आणि आर्थिक विवंचनेत होते. अखेर कर्जबाजारीपणा आणि सावकारांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर आज दुपारी सुदाम पडघन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूमुळे गावासह परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिकांकडून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इतकी गंभीर घटना घडूनही प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर तरी प्रशासन जागे होणार का, खासगी सावकारीच्या जाचाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाणार का, असे सवाल आता उपस्थित होत आहेत. एका शेतकरी कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे ग्रामीण भागातील आर्थिक विवंचना आणि खासगी सावकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.