नवी दिल्ली
bjp and shiromani akali dal पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दल यांनी पुन्हा एकदा राजकीय हातमिळवणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी या युतीची घोषणा केली. विशेष म्हणजे, आगामी निवडणुकीत अकाली दल मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल आणि मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही याच पक्षातील असेल, असे शाह यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पंजाबमधील आगामी राजकीय समीकरणांमध्ये अकाली दलाला महत्त्वाचे स्थान मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भाजप आणि अकाली दल पंजाबमधील विधानसभेच्या सर्व ११७ जागांवर एकत्र निवडणूक लढवतील. या आघाडीत अकाली दल मोठ्या भावाची भूमिका बजावेल. 'अकाली दल मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल. आम्ही सर्व ११७ जागांवर एकत्र निवडणूक लढवू. मोठा भाऊच मुख्यमंत्री होईल. म्हणजेच अकाली दलाचा नेताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल,' असे शाह यांनी स्पष्ट केले. मात्र, दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचे नेमके सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही.
जागावाटपाचा निर्णय चर्चेतून
जागावाटपाबाबत बोलताना अमित शाह यांनी दोन्ही पक्ष एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील, असे सांगितले. अकाली दल आजपासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) अधिकृत मित्रपक्ष म्हणून काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी दोन्ही पक्षांनी अनेक निवडणुका एकत्र लढवल्या असून, या काळात विजय आणि पराभव दोन्ही अनुभवले आहेत. मात्र, दोन्ही पक्षांमधील संबंध कायम असल्याचे शाह यांनी नमूद केले.
अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनीही या युतीचे स्वागत केले आहे. पंजाबमधील सर्वसामान्य नागरिकांसह विविध समाजघटक आणि धर्मांतील लोकांची भाजप व अकाली दलाने एकत्र यावे, अशी इच्छा होती. ही युती जनभावनांचे प्रतिबिंब असल्याचे बादल यांनी म्हटले.भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात अनेक वर्षांपासून राजकीय आघाडी होती. मात्र, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू झाल्यानंतर २०२० मध्ये अकाली दलाने भाजपसोबतची युती तोडली होती. त्यानंतर २०२२ मध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोठा फटका बसला. भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या, तर अकाली दलालाही मर्यादित यश मिळाले. दुसरीकडे, आम आदमी पक्षाने ९२ जागा जिंकत राज्यात सत्ता स्थापन केली.
युतीचा पूर्वीचा निवडणूक प्रवास
भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांनी यापूर्वी पाच वेळा एकत्र विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. १९९७, २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांची आघाडी होती. यापैकी १९९७, २००७ आणि २०१२ मध्ये युतीला सत्ता स्थापन करण्यात यश आले. तर २००२ आणि २०१७ मध्ये युतीला पराभवाचा सामना करावा लागला.
२०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल
पंजाब विधानसभेच्या एकूण ११७ जागांपैकी आम आदमी पक्षाने ९२ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला १८ जागा मिळाल्या. भाजपला दोन, अकाली दलाच्या आघाडीला दोन, तर इतर पक्षांना एक जागा मिळाली होती.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरी
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील १३ जागांपैकी काँग्रेसने सात जागा जिंकल्या. आम आदमी पक्षाला तीन, शिरोमणी अकाली दलाला एक, तर इतरांना दोन जागा मिळाल्या. भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती.
आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि अकाली दल पुन्हा एकत्र आल्याने पंजाबमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अकाली दलाचा असेल, हे अमित शाह यांनी स्पष्ट केले असले तरी जागावाटप आणि निवडणूक रणनीतीबाबत दोन्ही पक्षांच्या पुढील चर्चेकडे लक्ष लागले आहे.