नवी दिल्ली
cbi हत्या प्रकरणात फरार असलेल्या आशीष कुमार याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कझाकस्तानमधून भारतात आणण्यात यश मिळवले आहे. परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि हरियाणा पोलिसांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेच्या (इंटरपोल) रेड कॉर्नर नोटिशीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात आला. भारतात परत आणल्यानंतर दिल्ली येथे हरियाणा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

सीबीआयच्या माहितीनुसार, आशीष कुमार हरियाणामध्ये दाखल असलेल्या एका हत्या प्रकरणात हवा होता. नोव्हेंबर २०२५ मध्ये एका विवाह सोहळ्यादरम्यान मृत व्यक्ती आणि आशीष कुमार यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर संबंधित व्यक्ती विवाहस्थळावरून आपल्या वाहनाने निघाली असताना आशीषने साथीदारांच्या मदतीने रस्त्यात तिची गाडी अडवली. त्यानंतर तिच्यावर बेदम हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणात हरियाणा पोलिसांच्या विनंतीनुसार सप्टेंबर २०२६ मध्ये आशीष कुमारविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर कझाकस्तानमधील इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याचा ठावठिकाणा शोधण्यात आला. अल्माटी शहरात तो असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला भारतात परत आणण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सोमवारी त्याला भारतात आणण्यात आले असून, दिल्ली येथे पोहोचल्यानंतर हरियाणा पोलिसांनी त्याचा ताबा घेतला.
दरम्यान, इंटरपोलच्या माध्यमातून फरार आरोपींना भारतात परत आणण्याच्या मोहिमेत सीबीआय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारतात इंटरपोलचे नॅशनल सेंट्रल ब्युरो म्हणून सीबीआय कार्य करते. देशातील विविध तपास यंत्रणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलीस सहकार्य मिळवून देण्यासाठी ‘भारतपोल’ या यंत्रणेद्वारे समन्वय साधला जातो. २०१९ पासून आतापर्यंत इंटरपोलच्या माध्यमातून ३०० हून अधिक वॉन्टेड आरोपींना परदेशातून भारतात परत आणण्यात आले आहे. त्यापैकी २०२६ या वर्षात आतापर्यंत ७५ फरार आरोपींना भारतात आणण्यात यश आले आहे.यापूर्वी १८ नोव्हेंबर रोजी सीबीआयने केरळ पोलिसांच्या समन्वयाने रघेश उन्नीकोचन याला संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) भारतात आणले होते. केरळमधील हत्या प्रकरणात तो फरार होता. त्याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, तसेच अटक वॉरंटही जारी झाले होते. इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिशीच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला भारतात परत आणण्यात आले होते.