धुळे
dhule district jail superintendent eknath shinde धुळे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक एकनाथ शिंदे यांच्या आकस्मिक निधनाने कारागृह प्रशासनासह संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एकनाथ शिंदे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते घरी गेले होते. घरी पोहोचल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ही बाब लक्षात येताच नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
एकनाथ शिंदे हे मितभाषी, मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित होते. त्यांच्या स्वभावामुळे आणि कामातील तत्परतेमुळे त्यांनी सहकारी व परिचितांमध्ये आपुलकीचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कारागृह प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये शोक व्यक्त होत असून, धुळे शहरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.